Tuesday, 10 April 2018

शांतव्वा


गावाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या ST च्या खिडकीतून डोकावले तर पाटलांचा चिरेबंदी वाडा नजरेस पडायचा. मोठ-मोठ्या दगडी विटांनी बांधलेल्या भिंती , त्यात हे भले मोठे सागवानी दार. गावातील मंडळींसोबत गुजगोष्टी करण्यासाठी विटांनी बांधून घेतलेली बैठक व्यवस्था आणि त्यावर शेणाचा सपका. दारासमोर सारवलेले आंगण, तिथे रोज चुकता शांतव्वा पहाटेच्या वेळेस रांगोळीची सुबक नक्षी उमटवत असे. पाटलांचा वाडा गावाची शान होता. दारातून आत आल्यावर तुळशीवृन्दावन होते. वाड्यात दूधदुभती जनावरं देखील होती. गाय आणि तिचे वासरू, दोन म्हशी, पाच सहा शेळ्या. किसन पाटील म्हणजेच दाजी. आई वडिलांच्या पश्च्यात मेहनत करून तीस एकर शेती, जनावरे कमावली होती. शेतीच्या कामात स्वतःला पूर्णपणे त्यांनी झोकून दिले होते. प्रगत शेतीबद्दलचे धडे ते गावातील तरुण पिढीला देत होते. विहिरीतील मुबलक पाणी , बागायत जमीन आणि आई वडिलांच्या आशीर्वादसोबतच वरुणराजामुळे शेतीला बरकत होती.
पहाटेच्या निरव शांततेमध्ये शांतव्वा काही तरी गुणगुणायची. तिला साद देत गोठ्यातल्या गाई , म्हशी त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज करत. त्यामुळे सारा आसमंत उजळून निघायचा. शांतव्वाच्या लहानपणी तिच्या आईचे ते मधाळ गुणगुणणे तिच्या स्मरणात होते. त्यानंतर डोक्यावरचा पदर हा सावरत एका हाताने जळण चुलीत घालायची तर दुसऱ्या हाताने फुंकरीच्या साह्याने चूल पेटवायची. मग गोटा साफ करून दूध काढायला घ्यायची. हि सर्व कामे आटोपल्यावर डोक्यावर भाकरीचं गाठोडं घेऊन सूर्य माथ्यावर येण्याच्या आत  नागमोडी वळणाचा रास्ता पार करून  अर्धा मैल चालत शांतव्वा रान गाठायची. सांजवेळी तुळशीसमोर हात जोडून जेव्हा ती उभी असायची तेव्हा लुकलुकणार्या दिव्यातून येणारा पिवळसर मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडल्यावर ठसठशीत मोठं कुंकू कपाळावर लावणारी शांतव्वा लक्ष्मीसारखी प्रतीत व्हायची.
वयाच्या पंधराव्या वर्षीचं शांतव्वाचं लग्न झालं होतं. शांतव्वाच्या घरची परिस्थिती हि बेताचीच होती. पाच खाणारी तोंडं. पाटलाचं स्थळ चालूनच आलं होतं म्हणून शांतव्वाचे हात पिवळे केले. दाजी म्हणजे शरीराने दणकट, नेहमी पांढरे धोतर आणि झब्बा घातलेला ,डोक्यावर फेटा, सरळ टोकदार नाक ,निमुळते ओठ आणि गालापर्यंत आलेल्या मिश्या, यामुळे दाजी रुबाबदार दिसायचे आणि या दाजींसोबतच शांतव्वाची गाठ बांधली गेली. कमी वयातच मोठी जबाबदारी तिच्यावर पडली होती तरी हि ती पूर्ण श्रद्धेने सर्व काही करायची. शांतव्वा सुरवातीला त्यांना घाबरायची पण नंतर हळू हळू त्यांचा स्वभाव तिला समजत गेला. तिला शिकायची आवड होती. चुलीत जेव्हा चिटोऱ्या, फाटलेले कागद ती घाले तेव्हा दाजीच्या नकळत त्यात काय लिहलं आहे हे वाचायचा ती प्रयत्न करायची. लग्नाला आठ वर्ष झाले होते तरी पण पाळणा हलला नव्हता. शांतव्वाने बरेच उपास केले. नवस बोलले तरी पण काहीच झाले नाही. अलीकडच्या काळात दाजी शांत शांत राहू लागले होते. त्यांची चीड चीड होत असे पण ते शांतव्वाला काही बोलत नव्हते. पण तिला त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून दिसत होते ते. मुलं नसल्याचं वैफल्य दिवसेंदिवस गडद होत  चाले  होते. सकाळी वाड्यातून बाहेर पडल्यावर भर उन्हांत रानातील कामे करून विश्रांतीसाठी दाजी आमराई मध्ये जात असत. दूरवर पसरलेली झाडे त्याला लटकलेले मोहर. त्यामुळे शिवारात एक सुवास दरवळत होता. मधून मधून माश्या गुंजारात होत्या. त्या गर्द सावलीत आणि निरव शांततेत दाजींचे भणभणारे डोके थोडे  शांत व्हायाचे.
असेच दिवस जात होते. एके दिवशी शांतव्वाच्या माहेरवरून सांगावा आला. तिच्या भावाच्या म्हणजेच सुख्याच्या पोराचं बारसं होतं. ती आनंदाने हुरळून गेली. एवढ्या दिवसानंतर माहेरवरून बोलावणं आलं होतं. सुसाट वारा यावा त्यात बेभान पाऊस पडून जावा आणि त्यातच सैरावैरा धावणाऱ्या वासरासारखे तिचे मन माहेरच्या चौकटीवर येऊन धडकले आणि ढगांच्या कोपऱ्यातून सूर्य किरणांनी कानोसा घ्यावा तसं तीच मन बालपणीच्या आठवणींचा कानोसा घेत होतं. माता यशोदेने लोण्याचा गोळा लहान्या श्री कृष्णाच्या हातावर ठेवल्याने प्रफुल्लीत मुद्रा करून बागडावे तसे शांतव्वाचे मन बागडत होते. ओढ्याच्या पलीकडे शांतव्वाचं माहेर. सुख्या हा शांतव्वाच्या पाठीवरचा. लहान पोरांचा तिला लळा होता. शांतव्वाला भाऊ झाल्यावर अख्या गावात तिने पेढे वाटले. आपल्या भावाला ती खाऊ पिऊ घालायची, अंघोळ घालायची. त्याच्या हनुवटीला धरून त्याचा भांग पाडायला तिला खूप आवडायचे. प्रेमाने सर्व काही करायची. सुख्याच्या पोरासाठी तिने चांदीचा करदोडा आणि भावा आणि वहिनींसाठी आहेर घेतला. आज त्याच भावाच्या पोराच्या बारशाचा सांगावा आला होता. दुसऱ्या दिवशी सगळी कामं उरकल्यावर सकाळच्या बसने माहेरी जाण्याचा रास्ता तिने धरला.
गावाची सर्व मंडळी खोपट्याजवळ जमली होती. एकीकडे बाया जेवण बनवण्यात मश्गुल होत्या तर आलेल्या बायकांना हळदी कुंकू तारा देत होती. तारा म्हणजे शांतव्वाची चुलती. तर एकीकडे पुरुष मंडळी सरपंचासोबत गप्पा मारण्यात मग्न होते. खोपटीला रंगरंगोटी केल्यामुळे जुनीच खोपटी नव्याने भासत होती. कार्यक्रम चालू व्हायाला अजून बराच अवधी असल्यामुळे अंगणांतच पारिजातकाच्या झाडाखाली गोदा पोराला खेळवत बसली होती. गोदा म्हणजेच शांतव्वाची वाहिनी. शांतव्वा बाजूलाच चपल काढून पोराला डोळं भरून बघू लागली. पोराने सुख्याचा मुखडा घेतला आहे म्हणून मनोमन शांतव्वा खुश झाली. पोतडीतून आणलेलं सर्व सामान बाहेर काढत गोदाच्या हाती सुपूर्त केले. मायेने दोघांच्याही चेहऱ्यावरून हात फिरवून स्वतःच्या डोक्याला लावत कडा कडा बोटं मोडली. बाप झाल्याचा आनंद सुख्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. शांतव्वा तिथून उठून खोपटीत कामाला हात भार लावायला गेली. तिची पाट वळाल्यावर गोदाने काही क्षणांतच आक्रोश करायला सुरुवात केली. तिच्या आवाजाने खोपटीतील सर्व लोक आता अंगणात जमा झाले. तिच्या पोराने डोळे पांढरे केले होते. सर्दीमुळे त्याच्या अंगात ताप होता. घरातील उपचारामुळे दोन दिवस अंगावरच काढले होते. ताप त्याच्या डोक्यात जाऊन त्याने डोळे पांढरे केले. ह्या सर्व बाबींचं खापर मात्र शांतव्वाच्या माथी मारलं गेलं. "झंझोटी ,पांढऱ्या पायाची माझ्या पोराला खायला आलीस का इथं?". गोदाचे हे शब्द ऐकून शांतव्वाचं काळीज चर्र चर्र झालं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. लहानपणी जिच्या हातचे दोन घास खाल्याशिवाय गुपचूप बसणाऱ्या सुख्याने आज त्याच हाताला धरून त्याने सर्वांदेखत फरफटत शांतव्वाला बाहेर काढत ह्या घरची पायरी चढू नकोस बजावले. एका क्षणात त्याने तिला परके केले. जात्याच्या दोन दगडी पाटा एकमेकांवर घासून डाळीचे चिथडे व्हावे तसं तुकडे तिच्या काळजाचे झाले
रवी ताकात घुसळावी तसं अनेक विचार शांतव्वाच्या मनात घोळत होते. डोळ्यांत आसवे घेऊन जड अंतकरणाने तिने सासरकडची बस पकडली. कंबरेत जोराची लाथ कुणी तरी मारावी आणि सगळं अवसान गळून पडावं अशी तिची अवस्था झाली होती. भावाने केलेल्या अपमानाने ती कोलमडून गेली. घडलेला प्रकार तिने दाजींना सांगितला नाही. शांतव्वाच्या अवस्थेकडे बघून तिच्या माहेरी काही तरी झालेलं आहे हे दाजींनी हेरलं. राना वनात वणव्याने घेतलेल्या आगीत भस्म होऊन पडलेल्या पाचोळ्यासारखी शांतव्वा रात्रभर तळमळत राहिली. माहेरचा एक आधार होता आता तो हि तुटला.
तिथून आल्यावर शांतव्वाच्या डोक्यात काही तरी शिजत होते, दाजींना बोलायचं कसं याचा विचार ती करत होती. सकाळी जेवण झाल्यावर पाण्याचा तांब्या दाजींना देत शांतव्वा म्हणाली ,"थोडं बोलायचं हुतं बोलू का "?. दाजी तिच्याकडे बघताचं बोलत होते ," मंग , बोल कि कुणी अडवलं हाय ". दाजी आपल्या भारदस्त आवाजात बोले. शांतव्वा नरमाईने घेत बोलू लागली," नाय म्हटलं आपल्यास्नी पोर बाळ होइनात तवा  म्यास  सवत आणायचा इचार करावा". शांतव्वा तिच्या हृदयावर दगड ठेवतच दाजींना बोलत होती. तिच्या आवाजात समजुतदारपणा वाटत होता आणि धन्याची काळजी तिच्या बोलण्यात प्रखरपणे जाणवत होती. त्यांचं सुख कशात आहे हे तिला कळून चुकले होते. नवऱ्याचं सुख ते आपलं सुख असं मानून चालणारी भाबडी शांतव्वाच ती.  शांतव्वाच्या काळजाला लागलेली जखम अजून भरली नव्हती. दाजी शांतव्वाच दुःख समजू शकत होते पण त्यांचाही नाइलाज होता. तिचं पोरा बाळासाठी झुरत राहणं दाजी उघड्या डोळ्याने बघण्याखेरीस काहीच करू शकत नव्हते.
तिच्या प्रश्नाने निरुत्तरीत होतं चेहरा लालबुंद करत राग-रागात फेटा घेऊन झप झप ढांगा टाकीत दाजींनी रानात जायचा रास्ता धरला. रागात बाहेर पडलेल्या दाजींच्या वागण्याचा अर्थबोध  शांतव्वाला समजत नव्हता. रानात गेल्यावर दाजी आमराईमध्ये जाऊन एका झाडाच्या सावलीमध्ये आपला देह जमीवर टाकत हाताची त्रिकोणी घडी डोक्याखाली घेत झाडाच्या फांद्यामधून दूरवर पसरलेल्या आभाळात त्यांची नजर गेली. ते शांतपणाने विचार करत होते. आपल्याला मुल बाळ होत नाही ह्यात दाजींचा दोष आहे हि गोष्ट त्यांनी शांतव्वापासून लपवून ठेवली होती. दुसरं लग्न केल्याने त्यांचा प्रश्न सुटणारा नव्हता. त्या गोष्टीचे संपूर्ण ज्ञान त्यांना होते. दाजींचं शांतव्वावर खूप प्रेम होतं. दाजी विचारांच्या कोशात अडकत चाले होते.
हृदयाला बोचणाऱ्या काट्यांवर मात करण्यासाठी दाजींनी एक योजना आखली. वाड्यावर आल्यावर दाजी डोक्यावरचा फेटा काढत शांतव्वाला बोलू लागले, "ये अस्सं समोर माझ्या". शांतव्वाला दाजी आता मायेने बोलत होते. शांतव्वाने मानेनेच नकार दर्शवला. तसे दाजी हसायला लागले. दाजी अनपेक्षितपणे समोर येताच मागे जाणारा पदर लगबगीने पुन्हा डोक्यावर घेतला. पण तिने आपली नजर जमिनीवर रोखली होती. शेवटी शांतव्वाच्यासमोर उभे राहत दाजी तिला बोलू लागले, "तुला लिवया वाचया लयं आवडतंय ठावं हाय म्यास्नी. आपल्या वाड्यातील मांजर कसं च्वारुन दूध पितया तसं तुला च्वारुन वाचितांना कीत्यानंदा बघितल्या म्या. शांतव्वाची चोरी पकडली गेली म्हणून ती डोक्यावरचा पदर कपाळापर्यंत घेत खांदे गालापर्यंत घेऊन जात मान हि कासवासारखी आणखीनच आत घेऊन दाजींपासून चेहरा लपवण्याचा भाबडा प्रयत्न करू लागली. मनांत असलेले शल्य आणि कोलाहल दाजी शांतव्वासमोर मांडत बोले, “आपल्यास्नी पोर बाळ होत नाय यात तुझा काय बी द्वाश  नाय. समदा द्वाश माझ्यात हाय.”  तशी शांतव्वाची नजर दाजीच्या नजरेला भिडली. शांतव्वाच्या नजरेतून तिची होणारी घुसमट,बैचेनी दाजींना पिळवटून टाकत होती. एवढे दिवस सोसलेले शिव्या शाप कुणाकडे हि त्याचे गराहने करता एकटी कण्हत राहिली शांतव्वा. एवढ्या वर्षांची खंत उरी बाळगून असणाऱ्या दाजींनी आपले दोन्ही हात जोडत शांतव्वाकडे माफीची याचना केली आणि ओक्सबोक्शी रडू लागले. तिच्या डोळ्यांतून हि घळा घळा पाणी वाहू लागले. शांतव्वाने आपले दोन्ही हात दाजींच्या हातावर ठेवत मोठया मानाने त्यांना माफी दिली. पुढे दाजी बोलत होते, “दुसऱ्यांदा लगीन केलं तर गाव तोंडात शानं घाललं ते येगळंच पण तुला अंतर द्यायचं माझ्या बाप जन्मात व्हायाचं नाय बघ.. हे ऐकताच ती मनोमन सुखावली. आता स्वतःला सावरत दाजी दृढ निश्च्याने बोलत होते, “म्या काय तरी ठरवलं हाय. तु पुढलं शिकशान घ्यावं आणि गावचा इकास करावा असं म्यास्नी वाटतया. तुझ्या पाठीस म्या भक्कमपण उभा राहीन. तिच्या अश्रूंचा बांध कधीच तुटलाआई वडील निवर्तल्यावर दाजींना शाळा सोडून पोटा पाण्यासाठी शेतीची कामं करावी लागली होती. दाजी चवथी पास होते. ते स्वतः शिकले नाहीत पण आज शांतव्वाला शिकायची आण घालून तिला पाठींबा देणार होते.
तिच्या ध्यानी मणी नसणारे असे काही तरी विचार दाजींकडून येतील असं तिला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. दाजींवर तिची परमेश्वरा इतकीच निष्ठा असल्यामुळे  दाजी जे सांगतील ते पडत्या फळाची आज्ञा मानत पुढच्या शिक्षणाचा श्री गणेशा केला. गावातील मास्तरलाच दाजीने वाड्यावर बोलावलं. शांतव्वासाठी एक शाळा वाड्यावर भरणार होती. घराचा उंबरठा हा फक्त विहिरीतील पाणी उपसण्यासाठी ओलांडला जावा हि समजूत फोल ठरवत शांतव्वाने मात्र सुटलेली पाटी पेन्सिल परत एकदा हातात घेतली होती. आपल्यासोबत गावातील बायकांनीही शिकायला हवे हि भावना तिला शांत बसू देत नव्हती. बायकांना शिकता यावं म्हणून तिने दाजी आणि मास्तरांच्या मदतीने 'रात्र शाळा' सुरु केली. सकाळी शांतव्वा जे काही शिकत असे तेच ती  'रात्र शाळेत' शिकवत असे. विधार्थिनीपासून एका शिक्षिकेमध्ये तिचे रूपांतरण झाले होते. एकीकडे दाजी गावातील पोरांना प्रगत शेतीचे धडे देत होते तर एकीकडे शांतव्वा शिक्षणाचे धडे गिरवत होती. तिला आता हळू हळू शिक्षणाचे महत्व पटू लागले होते. शांतव्वा आता मॅट्रिक पास झाली होती.
गावातील मुली शहाण्या झाल्या किंवा पैशाअभावी किंवा कुण्या श्रीमंताचं स्थळ  चालून आलं  कि मग लगेच त्यांचं लग्नाचं बघायचं. जे वय मौजमजा करण्याचं असतं त्या बालवयात त्यांच्यावर प्रौढत्वाच्या ओझ्याचा हंडा देत संसाराच्या दावणीला बांधून टाकलं जायचं  आणि  शिक्षणाची ओढ हि कागदावर येण्याआधीच तो कागद चुरगळा जायचा. शांतव्वा गावातील बायकांचे , मुलींचे मन वाचत होती. त्यांना मोकळेपणाने बोलता यावं म्हणून शांतव्वाने गावातच 'मुक्तांगण वर्गासोबतच  'साक्षरतेचे वर्ग' सुरु केले. गावातील बायकांना शिक्षणाचे धडे देऊ लागली. गावातुन शिक्षणाच्या सभा ह्या शांतव्वा , दाजी आणि मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली होत होत्या. गिरवू अक्षर, होऊ साक्षर’, 'मुलगी शिकली प्रगती झाली', 'शिक्षण जर घेशील मुला ज्ञान थोर करेल तुला','हट्ट नको वंशाच्या दिव्याचा हट्ट हवा साक्षरतेचा' , असे आणि बरेच घोषवाक्य पाटलांच्या गावात ऐकू येऊ लागले. शांतव्वा मात्र गावातील बायकांसाठी आणि मुलींसाठी सावित्रीबाई फुले झाली होती. शब्दांची एकमेकांशी घातलेली सांगाड व त्यांचा नेमका अर्थबोध ती शिक्षणातून देऊ लागली. विचारांची अक्षरधारा ज्ञानगंगेच्या रूपात गावामध्ये झेप घेऊ लागली होती. शिक्षणासोबतच हळू हळू हुंडा बळी , बालविवाह कसे थांबवता येतील याकडे सुद्धा लक्ष देत असताना बायकांना त्या गोष्टीचे महत्व पटवून देऊ लागली. 
दोघांनीही आपल्या दुःखाला कवटाळून बसता त्यातून एक मार्ग काढला. शिक्षणामुळे शांतव्वाच्या दुःखावर फुंकर मारली गेली होती. गाव, गावातील माणसं, बायका, लहान पोरं आपली मानून त्यांच्या प्रगतीकडे लक्ष दयायला त्यांनी सुरुवात केली होती. आज दाजी आणि शांतव्वामुळे गाव हा खऱ्या अर्थाने सम्रुद्ध आणि विकसनशील झाला होता. आपल्या कष्टाच्या दौलतीमधून दाजींनी आणि शांतव्वाने अनाथ पोरांना दत्तक घेतले होते. गावा गावात शांतव्वासोबत दाजींचे नाव हि अभिमानाने घेतले जाऊ लागले. आता त्यांच्या गावा व्यतिरिक्त इतर गावाच्या बायका - पोरी शिक्षण घेऊ लागल्या होत्या. खऱ्या अर्थाने गावचा विकास झाला होता. शिक्षणाच्या हिमतीवर शांतव्वाने दुनियेला जिंकले होते आणि त्याचमुळे समाजाने तिला आता नावे ठेवता तिची पाठराखणच केली होती.



                                                                                                                    वृषाली सुनगार-करपे

Wednesday, 4 April 2018

लव्ह.. लग्न.. लोचा..

‘लग्न’ हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. म्हटलं तर हो , म्हटलं तर नाही सुद्धा. लग्न का करावे? ह्या बद्दल बरीच अनुमाने वा निष्कर्ष थोऱ्या मोठ्यांनी त्यांच्या अनुभवातून काढले आहेत आणि त्यालाच तिखट मीट लावून एक झणझणीत फोडणी हि युवा पिढीसमोर ठेवलेली आहे. माझ्याच एका मैत्रिणीच्या वडिलांनी तिला ,”लग्न का करायला हवे?” याचं कारण सांगितलं. कारण तसे खुपच मजेशीर आहे. लग्न केल्यामुळे हाडांचे शुद्धीकरण होते म्हणे. आता हाडांचे शुद्धीकरण म्हणजे नेमके काय? हा विषय खुप मोठा असेल हि. ह्या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर प्रत्यक्षात त्यांनाच भेटावे लागेल .कधी हा विषय निघालाच तर मग लग्न करायचं कारण काय, कुणी विचारलं तर आम्हीपण हेच कारण आता पुढे सरकवतो.
  कांदेपोहे हा एक महत्वाचा घटक जो कुणालाही चुकलेला नाही. मुलगी बिचारी पार केविलवाणी होऊन सर्वांसमोर येऊन बसलेली असते . आधीच भयभीत झालेली आणि त्यात प्रश्नांचा भडीमार. त्यातच कुठे तरी ‘च’ चा ‘का’ होतो आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. मुलगा ,मुलगी परिपक्व म्हणजेच mature झाले कि हा ‘शाही सोहळा’ थाटामाटात आपल्याकडे संपन्न होतोच होतो. आणि अशातच गमतीशीर किस्से पुढे येतात. परवाच माझ्या एका मैत्रिणीच्या बहिणीचा दाखवायचा कार्यक्रम झाला. मुलगा हा मूळचा भारतीय असून अमेरिकेत कामासाठी गेलेला होता. पद्धतशीर पोह्यांचा कार्यक्रम झाला सर्वांचा मान पान हि . कुणाकडे हि नजर वरकरून न बघता दबकत दबकत ती मुलगी सर्वांसमोर येऊन बसली होती. सहसा खेडेगावात हे असे दृश्य बघायला मिळते. मुलीला प्रश्नांची पृच्छा केली गेली. जाताना मुलगा बोला कि, “मी चार मुली बघितल्या आहेत. तुमची कन्या आवडली तर कळवतो”. एवढ्या मुलींमधून तो कोणती हि एकच मुलगी निवडणार हि काळ्या दगडावरची रेघ. पण ज्या ज्या मुलींना त्या मुलाने नाकारले आणि फुकटचे पोहे हादडले त्याच्या घरातील आयांनी नक्कीच त्याच्या नावाने बोटे मोडले असतील. हल्लीच येऊन गेलेला एक सुप्रसिद्ध मराठी सिनेमा “ची. व ची. सौ.का.” ह्या सिनेमाच्या डायरेक्टरने मुलीला दाखवायच्या कार्यक्रमापासून ते अगदी लिव्ह-in रिलेशनपर्यंतचे सर्वच प्रसंग त्यात मांडले आहेत. मुलांच्या ह्या निर्णयानंतर एक माध्यम वर्गातील आई वडिलांच्या गंभीर अश्या भावना विनोदातून रेखाटल्या आहेत. लग्न करावे कि करू नये किंवा मग हाडांचा शुद्धीकरण होईल कि नाही हे हि माहिती नाही. माझ्या आजीने मला सांगितलं होतं लग्न म्हणजे “दोन जीवांचा मेळ” असतो. हक्काचं माणूस असतं सोबत. प्रेमाने बघणार ,प्रसंगी ओरडणार , आपले रुसवे फुगवे काढणार . असं नातं जे कि,” तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना झाल्यासारखा”. कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणाने आपण आयुष्यभर एकमेकावर नितांत प्रेम करत असतो. ‘शादी का लड्डू जो खायेंगे वो भी पचतायेगा और जो ना खयेगा वो भी पचतायेगा’ अशी गत होते. लग्न करणे जरी आवडत नसले तरी आपण आई वडिलांच्या कृपेमुळे बोहल्यावर चडतोच. अश्याच एका भन्नाट लग्नाचा अनुभव काही दिवसांपूर्वी आला.
  संध्याकाळी व्हाट्सअप group वर धीरजचा संदेश आला कि, I am coming to पुणे .जवळ जवळ एक दिड वर्ष नाशिकमध्ये काम केल्यावर धीरजला पुण्यामध्ये नोकरी मिळाली. पुण्यामध्ये असलेले त्याचे बाकीचे मित्र मैत्रिणी पुण्याच्या जगमगत्या वातावरणासोबत जमवून घेत स्वतःची ठाम अशी ओळख करण्याच्या दिशेने पाऊल टाकत होते. आपल्या मित्रांपासून लांब राहणे कधी कधी त्याला असह्य होत असे. खुप दिवसानंतर धीरज येणार होता म्हणून त्याच्या गॅंगने त्याच्या स्वागताची जोरदार तयारी चालू केली होती. सर्वजण खुप दिवसांनी भेटणार होते. दुसऱ्या दिवशी शनिवार आणि रविवार असल्यामुळे गप्पांना उधाण येणार होते. ह्या दिड वर्षात पश्याला एक गोड मुलगी झाली होती. काही जणांनी गर्लफ्रेंड पटवली होती तर काहींचे बॉयफ्रेंड हि झाले होते .बिचारे मुलं लग्न न करताच सासुरवास भोगत होते . त्यांच्या बॅचलर आयुष्याची राखरांगोळी झालेली धीरज बघत होता आणि मनोमन हसत हि होता. मोन्याचं आणि पक्याचं लग्न तोंडावर आले होते. हे सगळं बघून धीरज सुखावला होता आणि आपल्या माणसात आलेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.
  नेहमीच आनंदी असणारा धीरज आज मात्र थोडा खिन्न दिसत होता. नकोस वाटणारा भूतकाळ आकस्मितपणे त्याच्यासमोर आला होता. मित्रांसमोर आज मोकळे व्हायचे अशी खूणगाठ मारूनच धीरज आला होता. आणि त्याने त्याचा भूतकाळ सर्वांसमोर मांडला. त्याचा हि आयुष्यात एक मुलगी होती कल्पना नाव होत तिचं. एका कॉलेज इव्हेंटमुळे ते दोघे एकमेकांना ओळखू लागले होते. आधी त्यांच्यात मैत्री झाली आणि मग हळू हळू प्रकरण वाढलं कधी त्यांना पण समजलं नाही. मग रोज गुपचूप एकमेकांना भेटणे , डोळ्यातूनच खाणा खुणा चालू होत्या. धीरजला कल्पना आवडू लागली होती. पण माशी कुठे शिंकली कळलंच नाही. धीरज नाशिकला गेल्यावर तिने त्याच्या सोबतचे सर्वच संबंध तोडले. धीरज तिला कॉल, messages करून मेटाकुटीला आला होता. तरी तिचा काही रिप्लाय आला नाही. तिच्याबद्दल त्याने तिच्या मैत्रिणींकडे विचारपूस केली. पण काहीच हाती लागत नव्हते. एके दिवशी Facebook वर तिचा फोटो त्याला दिसला. गळ्यात मंगळसूत्र असलेला. आज आपण तिथे असायला हवे होते त्या जागी कुणी तर तिसराच मुलगा आज तिथे उभा होता. हा विचार करून आणि ते छायाचित्र बघून तो मात्र पुरता कोलमडून गेला होता. त्यानंतर काही दिवसांनीच त्यांना समजले कि जोर जबरदस्तीने तिला लग्न करायला भाग पडले होते तिच्या घरच्यांनी. धीरज मात्र त्यानंतर शांत शांत राहू लागला होता. तिच्या आठवणीमध्ये कित्येक रात्री जागून काढल्या होत्या. शेवटी मनाला समजावून धाय मोकलून रडला तो आणि ते शेवटचं. कल्पना हा विषय त्याच्यासाठी त्यानेच बंद केला कायमचा. धीरजच शिक्षण हे सोलापूर सारख्या शहरात झालं होत. त्याचे सर्व मित्र मैत्रिणी सुद्धा चांगल्याच घरातून आले होते. छोटे शहर असल्यामुळे आणि नातेवाईक आजूबाजूला असल्यामुळे धीरजवर चांगले संस्कार झाले होते. साधी सरळ माणसं. शेतकरी कुटुंब . घरी आई वडील आणि त्यांचा एकुलता एक मुलगा धीरज. त्याची आई घरीच असायची. एक मुलगा तोही कामासाठी बाहेर असायचा. करमणूक म्हणून त्याची आई घरीच काहींना काही काम करत असायची. त्यातूनच एक छोटा पार्लरचा व्यासाय चालू केला होता. धीराजला पुण्यामध्ये येऊन दोन वर्ष झाले होते. बऱ्यापैकी चांगला पगार होता त्याला आणि थोडा सेटल होत होता. त्याच्या घरच्यांनी त्याच्या कांदेपोह्यांचा कार्यक्रम करायची सुरुवात केली होती. आमच्या ग्रुपने ही हे काम खुपच मनावर घेतलं होतं. आपल्या आपल्या friend circle मध्ये कुणी मुलगी आहे का हे बघायला सुरुवात झाली.
  ग्रुपमधल्या मुलींना तर वेळ, काळ ह्या कोणत्याच गोष्टीचे भान उरले नव्हते. मुलगी दिसली कि दिसली तिला बोलतं करायचं आणि आपला काम साधून घ्यायचं. असाच उद्योग करताना एक किस्सा झाला. मी पुणे स्टेशनच्या बस stop वर उभी होते. बराच वेळ झाला तरी हि माझ्या route ला जाणारी एकही बस फिरकली नाही म्हणून कंटाळून बस स्टॉपच्या आतील बाकावर जाऊन बसले. बस यायला बराच अवधी होता काय करायचं म्हणून मी आमचा उद्योग परत चालू केला. माझ्याच बाजूला एक मुलगी बसली होती. छान सिल्कची साडी घातलेली , हातात गुलाबी रंगाच्या बांगड्या होत्या , केसाची वेणी घालून गजरे लावले होते. मी बोलणं चालू केलं. तुझं नाव काय ? बराच वेळ झाला तरी तिच्याकडून काहीच प्रतिकीर्या येत नव्हती. बहुतेक तिला ऐकू येत नसेल असा विचार करून मी परत बसची वाट बघत होते. मला एक प्रश्न पडला होता कि एवढ्या उन्हात हि बाई चेहरा झाकून का बसली आहे आणि डोळ्यावर गॉगल का लावला आहे. तिला विचारावं तरी कसं म्हणून मी शांत बसले. थोड्या वेळाने तिनेच चस्मा काढला आणि तो काळाकुळकुळीत गॉगल पण. तिच्याकडे बघून मी तर मोठा ‘आ’ वसला. ती माझ्याकडे बघून बोली,” दीदी, wrong number “ म्हणत चालू लागली. तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिले. तेवढ्याच चला कुणी YCM आहे का ? ऐकू आले आणि मी गडबडीने स्वतःला सावरत बस मध्ये बसले. झालेला सगळा प्रकार आठवून माझंच मला हसू येत होत. धीरज आणि ती कल्पना करवत नव्हती.
  सकाळी घडलेला प्रकार सर्वांना सांगून हसून हसून बेजार झालो. धीरज खुप वेळ mobile मध्ये काही तर करत होता. मोन्यानेच त्याला विचारलं काय रे काय चालू आहे? धीरज हसला आणि थेट mobile मधला एका मुलीचा फोटोच दाखवला. धीरजला मुलगी आवडली होती त्याच्या नजरेत दिसत होते ते. चला सर्व मुलींनी सुटकेचा एक निश्वास सोडला. आता नसते उद्योग करावे लागणार नव्हते. आकांशा नाव होतं मुलीचं. दिसायला सुंदर, देखणी , गोरीपान होती. धीरज आणि आकांशा एकमेकाला शोभून दिसत होते. कांदेपोहे न करता आकांशाला भेटायचं ठरलं. दोन दिवस सुट्ट्या होत्या म्हणून सर्व गॅंग माझ्या घरी येणार होती. दोन दिवस आकांशाला आम्ही सर्व जण बारीक नहाळात होतो अर्थात तिच्या नकळत. आमच्या सर्वांना हि ती आवडली होती तास हिरवा कंदील धीरजला आम्ही दिला. म्हणतात ना माणसांचा स्वभाव समजण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो तर कधी कधी आयुष्य जातं. बघता बघता त्या दोघांच्या लग्नाची तारीख ठरली. व्हाट्सअँपच्या ग्रुप वर पूर्ण लग्नाचा माहोल तयार झाला होता. काही झालं तरी “हमारे यार कि शादी है..” प्रश्नच नव्हता.
  लग्न म्हटलं तर एक विधी असतो का? मेहंदी , बांगड्यांचा कार्यक्रम , साखरपुढा, हळदी, नाच गाणं असे अनेक कार्यक्रम होतात. धीरज आणि आकांशा आपल्या परीने आपल्या आई वडिलांचा भार कसा कमी करता येईल यावर लक्ष देत होते. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आवडीचे पोशाख पुण्यामधून घायला सुरुवात केली. मुंडावळ्यापासून ते हळदीचे कपडे शेरवानी, मोजडी, बूट ,चपलापर्यंत सर्व खरेदी दर शनिवारी किंवा रविवारी करत होते. आकांशासोबत मी ही एकदा खरेदीसाठी गेले होते. हा.. हा.. म्हणता म्हणता लग्नाची तारीख जवळ आली होती. प्रत्येकजण आपला जॉब सांभाळून संध्याकाळी लग्नाला जाण्यासाठी सज्ज झाला होता. कुणी सकाळी निघणार होते तर कुणी संध्याकाळी तर कुणी दुपारी. हळदीचा समारंभ आम्हांला मिळाला नाही. पोहचल्यावर सर्वांची गळाभेट झाली. थंडीचे दिवस असल्यामुळे कडकडून भूक लागली होती. जेवणाची आमची पंगत बसली आणि वाढपी म्हणून आमचेच कार्यकर्ते. सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद औसांडुन वाहत होता. आणि त्यातच भेट झाली होती शर्मिष्ठा म्हणजे प्रणवची बायको आणि तिची ३ वर्षची चिमुरडी स्वरा. हल्लीच एक दिड वर्ष झाले होते त्यांना भारत सोडून. खास धीराजच्या लग्नासाठी परदेशातून आल्या होत्या दोघी. जेवण झाल्यावर श्रावणीचा वाढदिवस पण साजरा केला. धीरज बिचारा बराच वेळ जागा होता. त्याचा हि पाय निघत नव्हता. शेवटी आम्ही सर्वांनी जबरदस्ती केल्यामुळे तो झोपायला गेला. दिवसभर ऑफिसचं काम आणि नंतर प्रवास ह्या मुळे सर्वजण दामले होते. थंडीचा वाढता औघ बघून सर्वजण आपल्या आपल्या खोली मध्ये गेले. लग्न घर म्हटल्यावर तशी हि झोप कुणालाच येत नव्हती. बाजूच्या खोलीतून अधून मधून हसण्याचा , तर कधी बांगड्यांचा आवाज येत होता. त्यातच एखाद्या लहान मुलाचा रडण्याचा आवाज. हे सर्व नानाप्रकारचे आवाज श्रवण करत आम्हाला सर्वांना झोप लागली.
  सकाळी १० वाजता वरात सुरु झाली. लग्नाच्या आधी नवऱ्या मुलाला नाचवत गाजवत पारण्याला घेऊन गेले. सोबत एक चार पाच करवल्यादेखील होत्या. तिकडे आकांशाची तयारी चालू होती. गडद चॉकलेटी रंगाच्या शालूमध्ये तिचा गोरापान देह खुलून दिसत होता. हातात हिरवा चुडा. त्यामध्ये एक एक मोत्यांच्या बांगड्या भरल्या होत्या. केसांची मस्त हेअर style केली होती. कोरीव भुयांवर पेन्सिल काम केले. डोळ्यात काजल , कपाळावर मधोमध लाल रंगांची टिकली . कपाळाच्या एकदम वरती मधोमध केसांमध्ये बिंदी . हातावरचा मेहंदीचा रंग चढत चाला होता. आकांशाच्या मनात असंख्य प्रश्नांनी काहूर माजवले होता. तिचा वाद हा तिच्या मनापर्यंत पोहचला होता. तिची समजूत घालू पाहत होता. आपल्याला आता जायचे आहे. वयाची २५ वर्ष आपण आई वडिलांच्या सोबत होतो. प्रत्येक सुख दुःखात ते आपल्या सोबत होते. खुप लाडात वाढलेली होती ती. त्यांना आपण आज सोडून जाणार आहोत. त्यामुळे ती खुपच हळवी झाली होती. तिच्या जन्मांपासून ते अगदी आजच्या दिवसापर्यंतच्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागल्या होत्या. आपलं घर आपली माणसं सोडून एक नवीन जगात जाणार आहोत. असे जग कि पूर्णपणे अनोळखी. तिला घरातील एक एक प्रसंग आठवत होता तसं तिचं मन भरून येत होतं. मी अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि डोळ्यांनीच दोघीनीं एकमेकींना खुप काही सांगितलं . तिचं आवरून झाल्यावर खिडकीतून सहजच तिची नजर तिच्या लहानपणीच्या सायकलवर गेली. आज ती सायकल एकदम स्वच्छ दिसत होती . तिच्या बाबांनी तिला वाढदिवसाचं गिफ्ट दिलं होतं. ह्याच अंगणात तिला त्यांनी सायकल चालवायला शिकवली होती. किती तरी वर्ष ती सायकल पडून होती पण त्यांनी कुणाला दिली नाही. आज ती आकांशासोबत जाणार होती. आकांशा तिच्याच विचारात असताना तिची आई रूममध्ये आली आहे हे तिला जाणवले नाही.
  आईसोबत घालवलेले अनमोल क्षण तिला आठवत होते. दोघींनी केलेलं डान्स, फॅशन शो ची तयारी, शाळेची तयारी आणि खुप सिक्रेटस. तेवढ्यात मुलींचा घोळका ओरडत आला,”ए, नवरा मुलगा आला गं चला खाली”. जोराचा आवाज ऐकल्यावर तिची तंद्री तुटली. लहानपणी गंमत म्हणून भातुकलीचा खेळ ती मैत्रिणींसोबत खेळायची. आज तो खेळ ती जगत होती. आपल्या परीला एकदा gathering मध्ये आपण नवरीच्या पोशाखात घेऊन गेलो होता हे तिच्या आईला आठवलं आणि घरी आणलं देखील होतं. पण आता परीला आपण फक्त सोडून येणार तिला घ्यायला तिचा राजकुमार आला आहे. आईच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धरा वाहू लागल्या. आईचा पदर धरून दुडू दुडू धावणारी आकांशा आज तोच पदर धरून डोळे पुसत होती. दोघीनीं हि एकमेकाला घट्ट मिठी मारली. परीला नजर लागू नये म्हणून आईने तिला काळा टीका लावला. त्या घोळक्यांत आकांशा दिसेनासी झाली . “नवरी मुलीला घेऊन या..” सगळीकडेच ऐकलेले शब्द परत एकदा कानावर आले. आम्ही सर्वजण धीरजच्या मागे उभे होतो. ‘शुभमंगल सावधान’ ऐकताच अक्षदांचा पाऊस पडत होता. मग विधी चालू झाले. आम्ही सर्वजण फोटो काढण्यामध्ये रमलोत. कुणी फेसबुक वर तर कुणी इन्स्टावर तर कुणी व्हाट्सअँपचा स्टेटस ठेवत होतं.
  लग्न..लग्न..लग्न.. अगदी काही तासांचा खेळ आहे. पण त्यासाठी लागणारी तयारी , होणारी धावपळ किती तरी महिन्यांपासून चालू असते. असा हा लग्न सोहळा सर्वांच्याच आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. जुनी नाती सोबत धरून नवीन नात्यांमध्ये रुजताना त्यात प्रेम, मधुरता भरायची असते. मनात हूर हूर असंख्य प्रश्न घेऊनचं नवरी मुलगी आयुष्याच्या जोडीदार सोबत चालत असते. सारखपुडापासून ते विदाईपर्यँतचा प्रत्येक क्षण मनाला लावून जातो, एकमेकांची मनं सांभाळत ,मान पान जपत दोन्ही घर एकमेकांमध्ये गुंतून जातात आणि मग सुरु होते नवीन आयुष्याची घोडदौड.
  ह्या सर्व गोष्टीतून एक बोध घेता येईल तो म्हणजे आयुष्याचा साथीदार निवडण्यासाठी 'फुकटचे कांदेपोहे' न हादडता धीरजप्रमाणे कांदेपोह्याचा कार्यक्रम रद्द करून आई वडिलांना विश्वासात घेऊन मुलगा आणि मुलीने भेटण्याचा बेत आखावा. एका 'कांदेपोह्या' वरून किंवा एक-दोन प्रश्न विचारून ती कशी आहे याचे तर्क वितर्क करता येऊचं शकत नाहीत. कांदेपोह्याच्या कार्यक्रमाकडे मुलीच्या घरचे डोळे लावून असतात आणि तशातच काही नकार आलाच तर कधी कधी मुलीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो तर कधी नकार पचवायची ताकद तिच्यामध्ये नसते. रूढी परंपरेने चालत आलेली हि प्रथा आपण किती दिवस कुरवाळत बसणार हे आता आपण ठरवायला हवे.
वृषाली सुनगार-करपे