Friday, 22 June 2018

कातिल पाऊस


हातात वाफाळलेला चहा आणि डोक्यात धूसर विचार. घरातील खिडकीच्या ऐका कोपऱ्यात उभा राहून चहाचा  एक एक घोट घेत पाऊसाचा आनंद लुटणाऱ्या त्या चिमुकल्या मुलांना बघत असताना नकळतच  त्याच्या  चेहऱ्यावर स्मितहास्य रेखाटले. कधी त्या मुलांना तो निरखत होता  तर कधी आकाशाकडे बघत होता.  जमिनीवर अचानक पडलेल्या गुळाला जश्या मुंग्यांनी घेरा घालावा तसं  आकाशात  ढगांनी दाटी केली. काही क्षणापूर्वी पांढरं शुभ्र  वाटणारा आकाश आता काळकूट दिसू लागलं . खिडकीतूनच त्याची नजर बस स्टॊपवर उभ्या असलेल्या त्या मुलीवर गेली. तिने बहुदा छत्री विसरली असावी. त्याला ती खिडकीतून अंधुक दिसत होती म्हणून त्याने खिडकीचा दरवाजा अजून थोडं खुला केला. आता मात्र त्याला ती नीट दिसू लागली. तिची प्रत्येक हालचाल त्याला अगदी व्यवस्थित दिसतं होती. अचानक आलेल्या सरींनी तिला पुरते नाहू घातले होते. त्यामुळे ती थोडीशी त्रासलेली भासत होती. पाऊसाचे दिवस चालू असताना छत्री जवळ ठेवायची एवढी साधी गोष्ट समजत नाही असं तो मनातल्या मनात बोलत होता. पण भिजलेली ती आणि तिला भिजवायला मागे पुढे न बघणारा पाऊस आणखीन जास्तच कोसळत होता. एका हाताने बॅग सांभाळत तर दुसऱ्या हाताने केसातील पाणी काढण्यात ती मग्न होती. तिच्या केसातून पडणारा प्रत्येक थेंब हा त्याच्या हृदयावर जाऊन पडत होता. इकडे तिकडे बघत असताना तिच्या मानेवरून नागिणीसारखे फिरणारे तिचे लांब केस त्याला घायाळ करत होते. कपड्यावरील पाणी झटकताना पुढे मागे होणारे तिच्या कानातील झुबे आणि कोरीव भुवया खाली असणारे  हरणी सारख्या तिच्या पाणीदार डोळ्याची होणारी कातिल उघड झाप. कपाळावरून ओघळणारे पाऊसथेंब आता तिच्या गालावर येऊ लागले. हातावरील नाजूक मनगटावर असलेले नाजूक घड्याळाची काच अलगद पुसणारी ती न थांबणाऱ्या पावसाकडे काहीतरी अपेक्षेने बघत होती. निसरड्या रस्त्यावर चालताना पाय घसरणार तर नाही आणि आपल्याकडे कुणी बघत तरी नाही ना म्हणून नजरेनेच एक कटाक्ष सगळीकडे ती टाकत होती. काही अंतर कापल्यावर पावसाने परत जोर धरला तशी ती मागे वळली. रिमझिम पावसात तिचे अर्धे अधुरे भिजलेले शरीर.  हा पाऊस कधीच थांबू नये अशी त्याची कामना होती. मात्र त्या  जुलमी पावसाला हे मान्य नव्हते. एव्हना त्याच्या कपातील चहा संपलेला म्हणून तो परत एक कप चहा घ्यायला आतील खोलीत जाऊन येईपर्यंत त्याची ती नाहीशी झाली. जाणाऱ्या बसकडे तो खिन्नपणे बघत राहिला. प्रत्येक वर्षीच्या पावसात तिचे ते पाणीदार डोळे त्याला आठवतात. त्या दिवशी  तिच्या सोबत पावसात तो ही भिजला देहभान विसरून. 


आभाळ भरून आलं,
वाऱ्याला कोणी आमंत्रण दिलं?,
हवेतला गारव्यानं मला जखडलं,
मुसळधार पाऊस पडणार, असं वाटलं,
आणि तो पाऊस, हो तोच पाऊस,
तुला माझ्यापासून दूर वाहवत नेणार,
हे मला ठाऊक नव्हतं....

त्या संध्याकाळी,
माझ्या मनाचं आभाळ भरून आलं,
मला गहिवरून आलं,
थंडीचं अंगभर काकडं भरलं,
माझ्याच अश्रूंच्या थेंबानी,
मला चिंब-चिंब भिजवलं,
तुला "निरोप" देताना,
डोळ्यांसमोर धुकं साचलं,
"तुझ्या-माझ्यात",
सातासमुद्राचं अंतर पडेल,
हे मला ठाऊक नव्हतं....


वृषाली सुनगार-करपे  
कविता : देवराम घोरपडे        
        

Wednesday, 16 May 2018

A Mother of Hopes

नेहा लहानपणापासून हुशार, दिसायला गोरीपान व सुंदर होती. अभ्यासात हुशार असलेल्या नेहाला शिकण्याची जिद्द होती. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे भरपूर पैसे कमवून घरच्यांना  सुखी करणे हा एकच  मानस तिचा होता. आईसोबत लहान बहीण हि लोकांच्या घरची धुणी भांडी करायची. लोकांच्या घरी जाऊन आपली आई आणि छोटी बहीण हे सर्व काम करत होत्या हे नेहाला आवडत नव्हते.नेहा शिक्षणसाठी बाहेर गावी असल्याने दर महिन्याला तिची आई तिला कसे बसे होतील तेवढे पैसे पाठवायची. Graduation नंतर घरच्यांना आर्थिकदृष्ट्या कश्याप्रकारे मदत करता येईल या विचारत असतानाच तिची नजर नोटीस बोर्डवर असलेल्या एका कागदावर गेली. ‘Hurry UP change your dreams' असंच काहीतरी लिहलेलं दिसलं. तो कागद एका लघुपटाच्या ऑडिशनची नोटीस असल्याचे तिच्या लक्षात आले.  हा कागद आपल्या कामाचा नाही असा विचार करत ती पुढे जायला निघणार तेवढ्यात तिची नजर शेवटच्या ओळीवर वर जाते. "निवड झालेल्या कलाकारांना आकर्षक मानधन दिले जाईल". हे सर्व बघून तिच्या डोक्यात चक्र चालू झाले होते. प्रयत्न करायला काय हरकत आहे असा विचार ती करत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मुली makeup करून auditorium hall मध्ये जमल्या. एकएक जण पुढे येऊन आपली ओळख करून देऊ लागल्या.  बाकींच्या मुलींसोबत नेहाने हि तिला जमेल तशी पण संपूर्ण आत्मविश्वासने acting केली . जवळ जवळ 100 मुलींचे ऑडिशन झाल्यावर  दोन तासांनी selected मुलींची नावे नोटीस बोर्ड वर लागलीआपण सिलेक्ट होणार नाही याची खात्री मनात बाळगून नेहा परत रूमवर जाण्यासाठी निघाली. तेवढ्यात तिच्या एका मैत्रिणीने तिला पळत येऊन सांगितले ,"कि तू सिलेक्ट झाली आहेस". रूमकडे जाण्यासाठी वळलेली नेहा आश्चर्याने लिस्ट पाहण्यासाठी notice board च्या दिशेने धावू लागली . लिस्टमधील तिच्या नावाच्या स्वरूपात तिला तिची पहिली कमाई दिसू लागली. 
दुसऱ्या दिवशी नेहा त्या निर्मात्याला भेटायला गेल्यावर प्रशांतने तिला स्क्रिप्ट वाचायला दिली. तिला ती स्क्रिप्ट आवडली. नेहा नव्यानेच सर्व काही अनुभवत असल्यामुळे ती खूप खुश होती. प्रशांतने नेहाला शूटिंग कधी, कुठे आणि किती टप्यात होणार याची माहिती सांगितली. लघुपटाची शूटिंग सुरु झाली. प्रशांतच्या सल्याने नेहा तिच्या acting मध्ये सुधारणा करू लागली.  लघुपटाचा काम हे अंतिम टप्यात आलं होतं. लघुपाटातून मिळणाऱ्या मानधनातून तिचे काही दिवस तरी सुखात जाणार होते. नेहाला ह्या क्षेत्रात आता रुची वाटू लागल्यामुळे ह्याच क्षेत्रात जीव ओतून काम करायचं असं तिने ठरवलं होतं. लघुपटानंतर नेहाला काही छोट्या मोठ्या संधी मिळाल्या पण या क्षेत्रातील कमी अनुभवामुळे तिला म्हणावे तसे काम मिळत नव्हते आणि त्याचबरोबर तिला आर्थिक चणचण हि भासू लागली. काम नसल्यामुळे नोकरीच्या शोधात ती होतीपैश्यांमुळे आईचे घरकाम वाढले आणि बहिणीच्या शिक्षणाबाबतीत हि अनिश्चितता दिसू लागली. पुढे काय करायचे हा विचार चालू असतानाच तिला परत प्रशांतचा कॉल आला. यावेळी त्याने तिला एका सिरीयलसाठी विचारले आणि याच संधर्भात त्याने तिला चर्चेसाठी घरी यायला सांगितले. नेहाने लगेच होकार दिला. सेरिअलच्या बातमीने ती खुश होती पण शंकेची पाल तिच्या डोक्यात चुकचुकली ती म्हणजे त्याने घरी का बोलावले?. ह्या आधी त्याने कधीच चर्चेसाठी घर निवडले नव्हते. 
नेहा प्रशांतच्या इमारतीच्या खाली उभी होती. गावाकडे राहणाऱ्या नेहाने कधीच एवढे मोठे प्रशस्त, हवेशीर घरे जवळून बघितले नव्हते. भोवतालचा परिसर न्याहाळत न्याहाळत ती एकदाची दरवाज्यासमोर पोहचली. केस आणि खांद्यावरची ओढणी नीट करतच एक मोठा श्वास सोडून तिने दारावरची bell वाजवली. हसत हसत प्रशांत आणि मेघनाने तिचे स्वागत केले.  त्यांनी तिच्या पहिल्या लघुकथेच्या आठवणींना उजाळा देत  चहा पाणी घेत बराचवेळ गप्पा गोष्टी केल्या. नेहा आता बऱ्यापैकी बोलती झालेली त्यांना वाटत होती. मनात संकोच ठेवतच मेघना नेहाकडे बघत तिला सांगू लागली, मूल होणं हे स्त्रीजन्माचं सार्थक मानलं जातं. मातृत्व हे देवाने प्रत्येक स्त्रीला दिलेली एक अनमोल देणगी आहे. आई होणे हे स्रियांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग असतो. आई होत असताना तिच्यामध्ये शाररिक , मानसिक बदल होत असतात. मातृत्व म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो. आपल्याच हाडामांसाचा गोळा जेव्हा आपल्या हातात येतो तेव्हा तिला आकाशही ठेंणग वाटू लागते. जर एखाद्या बाईला मुल होत नसेल तर आपला समाज हा तिला एक तर वाळीत टाकतो किंवा पांढऱ्या पायाची म्हणून तिची अवहेलना करतो. कधी वारंवार होणारे गर्भपात पचवून , तर कधी वंशाचा दिवा पेटेपर्यंत एका पाठोपाठ मुलींना जन्म देत राहते.
आजवर हृदयात दाबून ठेवलेली आईची माया आणि समाजाने स्त्री जातीवर केलेले घात मेघनाच्या शब्दांतून बाहेर पडत होते. त्यांचे लग्न होऊन ६ वर्ष झाले होते पण त्यांना मुल बाळ होत नव्हते. सर्व टेस्ट करून झाल्या होत्या. एक उत्तम आयुष्य जगताना त्या दोघांना बाळाची उणीव नेहमीच भासत होती. त्या भावनेने दोघेही कासावीस होत असे. एकमेकांना घट्ट मिठी मारून रडण्यापलीकडे ते काहीच करू शकत नव्हते. त्यांनी बाळ दत्तक घायचा हि विचार केला होता पण काही कारणाने ते शक्य झाले नव्हते. त्यांना नेहाचा एकमेव आधार दिसत होता. नेहाला संपर्क  करण्यापूर्वी त्याने तिची सर्व माहिती काढून ठेवली होती. ते तीच सर्व काही करायला तयार होते जर ती मानसिकरीत्या तयार झाली तर. सर्व गोष्टी ह्या गुलदस्त्यात राहतील अशी हमी देखील त्यांनी नेहाला दिली. डॉक्टरांच्या सल्यानुसार आपण हे सर्व करणार आहोत.  पोटाच्या खळगी भरायला नवीन काम मिळेल गरज भागेल अश्या विचारत नेहा प्रशांतच्या घरी गेली होती. पण क्षणार्धात तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. मेघना आणि प्रशांत तिच्याकडून एका बाळाची अपेक्षा करत होते. हा सर्व काय प्रकार आहे हे तिला समजण्याच्या पलीकडचे होते.  
तापलेल्या शिसासारखे तिचे शरीर गरम झाले होते. डोकं भणभण करू लागले होते. सोफ्यावर बसलेली नेहा डोळे विस्फारून ,कपाळावर आठ्या आणून प्रश्नार्थक मुद्रेने प्रशांतकडे बघू लागली. त्यामुळे तिचा प्रचंड संताप होत होता. जाणाऱ्या नेहाला मेघना शांतपणे आणि धीराने बोलली कि ," विचार करून तुझं उत्तर सांग". मेघनाकडे वळून बघण्याची तसदी देखील न घेता  नेहा घराबाहेर पडली. जाणाऱ्या अपेक्षांना खिन्नपणे बघण्याशिवाय मेघना आणि प्रशांत  काहीच करू शकत नव्हते.
रूमवर यायला तिला उशीर झाला होता. कुणाशी हि काही न बोलता फ्रेश होऊन नेहा बेडजवळ असलेल्या खिडकी जवळ उभी होती. तिचं सगळं अवसान गळून पडलं होतं. ती भयाण शांतात तिला खायाला उठली होती. रात्रीच्या अंधारात रस्त्यावरच्या मिणमिणत्या दिव्याखाली किड्यासारखी वळवळ करणारी काही माणसं तिला दिसत होती, जवळच असलेल्या मंदिरात देव ही शांत झोपी गेला असावा असं तिला भासत होते. तिला खूप एकटं वाटत होतं. आईच्या कुशीत डोकं घालून  खूप रडावसं तिला वाटत होतं तसं तिने आलेला आवंढा गिळला आणि बेडवर पाट टाकली. रातकिडे किरकिर करायला लागली होती, आभाळ गच्चं चांदण्यानं भरलं होतं आणि ढगांच्यासोबत त्या चंद्राचा लपंडाव चालू होता. ती आता शांत डोक्याने मेघनाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विचार करत होती. यामध्ये तिला फक्त पैसे दिसत होते जे तिच्या आईला आणि बहिणीला सर्व कष्टातून मुक्त करणार होते. नेहाला काही केल्या झोप लागत नव्हती. तिला चांदण्याने भरलेल्या काळ्या ढगांत आई , बहीण आणि मेघनाचा चेहरा दिसत होता. तशी ती बेचैन झाली. मध्यरात्रीपर्यंत सारखी कूस बदलत होती.
घरच्यांसाठी बघितलेले स्वप्न, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहा तयार झाली आणि म्हणूनच सकाळी उठल्यावर तिने मेघनाला call  केला आणि विचारले कि, “ हे सर्व माझ्यामुळे कसं काय होईल?” . काही दिवसांनी शूटिंग संपल्यावर ते तिघेही हि त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले होते. प्रशांतने डॉक्टरांना पूर्वकल्पना दिलेली होती. डॉक्टरांसोबत औपचारिक बोलणे झाल्यावर त्यांनी थेट विषयालाच हात घातला.  मेघना आणि प्रशांतने निवडलेला पर्याय म्हणजे  सरोगसी. मराठीमध्ये त्याला 'पर्यायी माता'  किंवा 'पोशिंदा' असे हि म्हणले जाते. ज्या स्त्रियांना जन्मजात गर्भाशय नसते , गर्भ तयार होण्यात अडचणी किंवा एखादे आजारपण , स्त्रीला प्रस्तुती दरम्यान जीवाला उदभवणारा धोका,  हृदयरोग किंवा किडनीच्या आजारांमुळे महिलेच्या प्रसूतीत अडचणी येण्याची शक्यता असल्यास अश्या सर्व परिस्थितीत डॉक्टर सरोगसीचा पर्याय सुचवतात. सरोगसीचे दोन प्रकार असतात. एक ट्रॅडिशनल सरोगसी म्हणजे – जोडप्यातील पुरुषाच्या शुक्राणूंचे पर्यायी मातेच्या बीजांडाशी  मीलन घडवून आणून ते त्याच महिलेच्या गर्भाशयात ठेवले जाते. तर दुसऱ्या म्हणजेच गेस्टॅशनल सरोगसीमध्ये - जोडप्यातील स्त्रीचं बीजांडं आणि पुरुषाच्या शुक्राणूंचं प्रयोगशाळेत मीलन घडवून आणलं जातं आणि तो गर्भ दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात ठेवला जातो. तिच्या शरीरात तो गर्भ रुजला कि नऊ महिन्यांच्या काळानंतर मूल जन्माला येतं आणि त्याचा मोबदला त्यांना देऊ केला जातो.
डॉक्टर जे काही सांगत होते त्याबद्दल तिला आता थोडे थोडे उमगू लागले होते. ते तिघेही आता आपल्या वाटेने निघाले. मेघना आणि प्रशांत हे आता नेहाच्या कॉलची वाट बघत होते. रूमवर आल्यावर चहा घेत ती खिडकीच्या बाहेर डोकावू लागली. डॉक्टरांचा एक एक शब्द तिला आठवत होता. हा पर्याय निवडणे तिच्यासाठी खूप अवघड होते. नेहाचे अजून लग्न झाले नव्हते. कुमारी माता हे ऐकल्यावर तिच्यासोबत कुणी लग्न करायला तयार होणे म्हणजे तिचं नशिबाचं. उराशी मोठी स्वप्नं बाळगून नेहा शहरात आली होती. व्यसनी बापाच्या कचाट्यातून आई आणि बहिणीला तिला सोडवून आणायचे होते. शहरातील गमतीजमती तिला त्या दोघींसोबत बघायच्या होत्या. इज्जतीने  कमावलेल्या चार पैश्यातून आईसाठी तिला साडी घ्यायची होती. तिच्या मनात अपराधीपणाची भावना जन्माला येत होती. त्या वेगातच तिने फोन हातात घेतला. मेघनाला call  करून सांगावे कि," मी ह्या कामासाठी तयार नाही". पण नेहाची हिंमत झाली नाही. नेहाने फोन बेडवर फेकून दिला. परिस्थिती समोर तिला झुकावे लागणार होते.  
कोणत्यातरी स्त्री, पुरुषाचा अंश आपल्या गर्भात  ९ महिने वाढवणे हि छोटी गोष्ट नाही. एखाद्या स्त्रीला जो आनंद त्या स्थितीमध्ये होत असतो तो आनंद इथे कुठे येणार? आपल्या बाळाची स्वप्न  रंगवत ती स्त्री भविष्यामध्ये जाते, बाळाची कल्पना करणे, मुल कसं  दिसेल आणि त्याचबरोबर शरीरामध्ये बदल होत असताना एक रोमांच उठणे , असह्य वेदना हि ती हसत हसत सहन करत असते ते फक्त तिच्या येणाऱ्या बाळासाठी. जन्माला आलेला बाळाला ती कुठे ठेऊ आणि कुठे नको करत असते, त्याचं कोडकौतुक करण्यात ती अजिबात थकत नाही. पण नेहाच्या case मध्ये ह्या सर्व भावनिक कल्पनांना काहीच जागा नव्हती. पर्यायी मातृत्वासाठी त्या बाईला मानसिक, शाररिक आणि मुख्य म्हणजे सामाजिक पैलूतून जावे लागते. जास्त विचार न करता नेहाने शेवटी मेघनाला होकार कळवला. तिला हे पटत नसून देखील नेहाने आपली तयारी दर्शवली होती.
शूटिंगच्या कामासाठी काही दिवस तरी बाहेरच असणार आहे तर काळजी करू नको असे तिने आईला  सांगितले . एका मोठ्या चिंतेतून ती बाहेर पडली होती. घरच्यांच्या सुखासमोर तिला काहीच दिसत नव्हते. पर्यायी मातेच्या रक्ताची तपासणी, एड्स तपासणी, तिला इतर काही आजार आहेत का हे सगळं पडताळलं जातं. या शारीरिक तपासणीबरोबरच तिचं काऊन्सेलिंग हि होतं. ती सरोगसीसाठी शारीरिक तसच मानसिकदृष्टय़ा फिट आहे हे त्यातून स्पष्ट झाल्यावरच गर्भ सोडला जातो. आयुष्यात कधीही रुग्णालायची पायरी नेहाने चढली नव्हती. कधी साधी सर्दी किंवा ताप आला तर घरगुती उपचारावरच ती बरी व्हायची. पण मेघनासोबत नेहाच्या रुग्णालयातील वाऱ्या सुरु झाल्या. नेहाच्या हि या चाचण्या चालू झाल्या. इंजेक्शन्स देण्यासाठी डॉक्टरांनी सुई काढली तसं नेहाला घाम सुटला आणि रडायला आले. घाबरून नेहाने मेघनाचा हात घट्ट पकडला होता. मेघना बहिणीच्या मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत होती. तिला धीर देत होती. सततच्या तपासण्या व गोळ्या घेत असताना नेहा शाररिकरित्या दमून जायची तेव्हा मेघना सतत तिच्या सोबत राहून तिला आधार द्यायची. नेहाचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले होते . डॉक्टरांच्या देखरेखीखाली नेहा होती.
डॉक्टरांनी ठरवलेल्या दिवशी ते तिघे रुग्णालयात दाखल झाले. फलित झालेल्या बीजाचे तिच्या गर्भाशयात प्रत्यारोपण केले गेले. तिची मानसिक अवस्था मेघनाला समजत होती. नेहाला वाटले तितके सोपे नव्हते सर्व. मेघना मनातून घाबरली होती. आज परत एकदा तिला नेहाला घेऊन डॉक्टरांकडे जायचे होते. ती मनोमन देवाचा धावा करत होती. गर्भ पूर्णपणे नेहाच्या गर्भाशयात रुजला कि नाही हे बघण्यासाठी प्रेग्नन्सी टेस्ट करायची होती. नॉर्मल रिपोर्ट्स बघून मेघनाने मोठा सुस्कारा सोडला.  नेहा आणि मेघना आता प्रत्येक दीड महिन्यांच्या अंतराने सोनोग्राफी तपासण्या करण्यासाठी जाऊ लागल्या
नेहाच्या शरीराचा आकार बदलत चालला होता. तिच्या पोटात काही तरी असल्याचा अनुभव तिला येत होता. कधी कधी मेघना नेहाच्या पोटावरून हात फिरवत बाळाचा स्पर्श अनुभवत होती. नेहाला मात्र कधी एकदा ह्या सर्वांमधून तिची मुक्तता होते असं वाटायचं. त्यानंतर काही महिन्यामध्येच तिने एका गोंडस अश्या मुलीला जन्म दिला. मेघना आणि प्रशांतला जग जिंकल्या सारखं वाटू लागले. नेहाने बाळाला त्यांच्या हाती सोपवले. नेहाच्या एका होकारामुळे त्यांच्या आयुष्यात एक सोनेरी किरण आले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी तिला पैसे दिले. एवढे पैसे दिले कि ते कमवायला तिला खूप वर्ष गेले असते. एक भाड्याच घर नेहाने घेतले. एकट्या असलेल्या आपल्या आईला आणि बहिणीला तिने आपल्याकडे बोलावले.
नेहा आता घरीच होती. आई आणि बहिणीला शहरात बोलावून घेतल्यामुळे तिची जबाबदारी वाढलेली  त्यामुळे तिला आता काम हवे होते. तिच्या कामात बराच खंड आल्यामुळे  कामाचा ओघ हि कमी झालेला. तिच्याकडे असलेले पैसेही संपत आले होते. प्रशांतच्या बहिणीला बाळाबद्दल माहिती होते. तिच्या बहिणीच्या ओळखीतील एका बाईला बाळ होत नव्हते. म्हूणन तिने नेहाबदल तिच्या भावाला विचारले. ती बाई तिला आदीपेक्षा जास्त पैसे द्यायला तयार होती. प्रशांतने नेहाला परत विचारले तेव्हा नेहा कोणतेही आढेवेढे न घेता तयार झाली. पण त्या बाईची एक अट होती कि नेहाने तिच्या घरी येऊन राहायचे. नेहाने विचार केला कि पैसे मिळत आहेत तर काय हरकत आहे तिच्या घरी राहायला.
परत एकदा नेहाने शूटिंगचं कारण पुढं केलं. नेहा तिचं सामान घेऊन त्या बाईकडे राहायला गेली. दिवस जात होते. नेहाला ती बाई रोज कीर्तन ऐकायला घेऊन जायची. नेहाला ते मुळीच आवडत नव्हते आणि त्याची सवय पण तिला नव्हती. तिला त्या बाईचा राग यायचा. मूड नसताना हि नेहा रोजच जाऊन बसू लागली. नेहाच्या हि नकळत तिच्यात आता बदल होत होते. कीर्तनावरून आल्यावर ती पोटात असलेल्या बाळासोबत गप्पा मारू लागली. मागचा एक अनुभव असला तरी या वेळेस ची pregnancy  तिला काही तरी वेगळीच भासू लागली. यावेळी पैश्याची जागा मात्र मायेने, वात्सल्याने, मातृत्वाने घेतली होती. आता तिला पैश्यापेक्षा हि आईपण जास्त मोलाचं वाटू लागलं. आई होणे म्हणजे काय असतेनेहाला आता मेघनाच्या शब्दांचा सूर गवसला होता. दिवसागणित बाळाचं आणि तिचं नातं वरचेवर बोलकं होऊ लागलं.
नेहा आता आपणहुनच कीर्तन , भजनला जाऊ लागली. सर्व काही ठरलेलं असताना हि नेहा पोटातल्या बाळामध्ये गुंतत चाली होती. देवासमोर नेहा जेव्हा हि उभी असायची तेव्हा तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या होत असत. पण त्या दोघंमध्ये तिला त्या बाईची अडचण वाटत होती. बाळाशी जोडल्या गेलेल्या नात्यामुळे कधी कधी तिला वाटत होते कि, ’ हे बाळ माझं आहे मी का देऊ कुणाला?’. कुणाशीच काही घेणे देणे नसल्यासारखी नेहा आता वेड्यासारखी तासन्तास बाळासोबत गप्पा मारायची.
काही दिवसांनी एका झळझळीत सत्याला तिला सामोरे जायचे होते. ह्या गोष्टीचा जणू तिला विसरच पडला होता. एक असे सत्य कि विज्ञानाच्या युगात केल्या गेलेल्या प्रयोगामध्ये तिच्या भावनांची राखरांगोळी होणार होती.  अखेरीस तो दिवस आलानेहाने एका गुटगुटीत मुलाला जन्म दिला होता. माझं बाळ करीत करीत ती बेशुद्ध पडली होती. शुद्धीवर आल्यावर नेहाने बाळाला डोळ्यात साठवून घेतले. काळजावर दगड ठेवतच बाळाला त्या बाईच्या हाती सोपवले होते. पण त्या घरातून तिचा पाय निघत नव्हता. बाळाच्या रडण्याचा आवाज तिला कावारा बावरा करून सोडत होता. त्या बाईला कळकळीची विनंती करून नेहाने तिथेच काही दिवस राहण्याची अनुमती मिळवली. बाळाला पळून घेऊन जाण्याचा तिने प्लॅन केला. पैश्यांची भरलेली बॅग नेहाने बाळाच्या झोपाळ्याजवळ कधीच ठेवून दिली होती आणि काळोख्या रात्री ती बाळाला घेऊन घराबाहेर पडली. काही अंतर चालत चालत आल्यावर नेहा भानावर आली. काय करत आहोत आपण हे? आज माझ्यामुळे कुणाला तर आई होण्याचं सुख मिळत आहे आणि तेच मी ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. भानावर आलेल्या नेहाने मागे वळून बघितले तर घरापासून आपण खूप लांब चालत आलोत हे तिच्या लक्षात आले. बाळाकडे परत डोळे भरून बघत ती भरभर बाळाचे मुके घेत असतानाच पावसाच्या थेबांमध्ये अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्याचं पावलांनी ती घरी आली. तिच्या कुशीत झोपलेल्या बाळाला तिने अलगतच झोपाळ्यात ठेवले. परत एकदा बाळाला तिने डोळे भरून बघितले आणि मुसळदार पावसात झाप झाप पावले टाकीत तिने आपला मार्ग निवडला. 
नेहासारख्या अनेक मुली/बायका आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी नसल्यामुळे , गोरगरीब आणि परिस्थितीने गांजलेल्या असल्यामुळे या महिला सरोगसीसाठी  नाईलाजाने तयार होतात. सरोगसी नंतरच्या दुष्परिणामांना तिलाच चार हात करावे लागतात. यात नैसर्गिक काहीच नसल्यामुळे मातेला मोठ्या दिव्यातून जावे लागते. सरोगसीसाठी गरजू महिलांना तयार केले जाते. तिच्या येणाऱ्या पैस्यांवर संपूर्ण कुटुंब पोसले जाते. या सर्व गुत्यांमध्ये  कधी कधी ती बाई त्या बाळावर आपला हक्कही दाखवू शकते. काही माता पोटातील बाळासोबत भावनिकरित्या नकळत बांधल्या जातात अश्या मातेला ते बाळ दुसऱ्याच्या हाती सोपवताना अपार यातनांना सामोरे जावे लागते. 
सरोगसी तंत्रज्ञानांचा नेमका वापर कुणी करावा?’ या बदल वारंवार प्रश्न उपस्थित होत असतात. सरोगसी शब्दावरून अनेक मोठी वादळे नेहमीच सुरु असतात. श्रीमंत लोकांसाठी, ज्यांना एकल पालकत्व हवे आहे, ज्या बायकांना पैसे देऊन स्वतःच्या प्रस्तुतीच्या वेदना दुसऱ्या स्त्रीच्या माथी मारायच्या असतात किंवा आपला शाररिक बांधा ढळू द्यायचा नसतो अश्या लोकांमुळेच 'सरोगसीचे बाजारीकरण' झाले आहे. गरीब मातेचे गर्भ भाड्याने घ्यायचे हा नियम फक्त अश्या जोडप्यांना लागू होतो ज्यांना मुलं होऊ शकत नाहीत. पण आता तीच गोष्ट शौक बनत चालली आहे.
१९७८ ला स्त्रीचे बीजांड शरीराबाहरे काढून एखाद्या प्रयोगशाळेत त्याच्यावर प्रक्रियाकरून मग ते त्याच किंवा दुसऱ्या स्त्रीच्या गर्भात सोडले जाते त्याचा शोध लागला आणि ज्यांना मुलं होत नाही त्यांच्यासाठी एक पर्वणीच ठरली गेली होती. काही लोक ह्या अविष्काराचा  योग्य तसा उपयोग करत ही आहेत आणि जे करत नाही त्यांच्यासाठी कायदा आहे. एखाद्या बाईला मुल होत नसेल तर दुसरी बाई म्हणजेच -पोशिंदा त्या बाईला  मातृत्व देऊन जाते. बुद्धीच्या बळावर मानवाने आतापर्यंत अनेक संशोधने केली आहेत आणि पुढे हि चालत राहतीलच. कुणे एकेकाळी वाटायचं कि हे सर्व काल्पनिक आहे. असे होणे शक्यच नाही. पण मातृत्व किंवा आईपण ह्या काही भाड्याने घायच्या गोष्टी नाहीत. मातृत्वा सारख्या पवित्र मानल्या जाणाऱ्या गर्भाचे बाजारीकरण ह्या पुढे करू नये. 'आई थोर तुझे उपकार' आपण अभिमानाने तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा अश्या मातांचा निःस्वार्थ त्याग समाज निसंकोच मनाने स्वीकारेल. हीच खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली तर पैसे, कायदा या पेक्षा माणुसकी नकीच श्रेष्ठ ठरेल.


वृषाली सुनगार - करपे 

Thursday, 3 May 2018

हिरवा चुडा

नात्यांत ह्या अलगद गुंतले मी
भरले रंग प्रीतीचे दोन्ही
घरांच्या तसबिरीत मी
आली घटिका समीप आज
सजले तोरण , मंडप दारी आज
कोरते नक्षी हातावर माझ्या 
तुझ्या नावांची आज
करती मंजुळ नाद मनगटी
भरते हिरवा चुडा  मी आज

Tuesday, 10 April 2018

शांतव्वा


गावाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या ST च्या खिडकीतून डोकावले तर पाटलांचा चिरेबंदी वाडा नजरेस पडायचा. मोठ-मोठ्या दगडी विटांनी बांधलेल्या भिंती , त्यात हे भले मोठे सागवानी दार. गावातील मंडळींसोबत गुजगोष्टी करण्यासाठी विटांनी बांधून घेतलेली बैठक व्यवस्था आणि त्यावर शेणाचा सपका. दारासमोर सारवलेले आंगण, तिथे रोज चुकता शांतव्वा पहाटेच्या वेळेस रांगोळीची सुबक नक्षी उमटवत असे. पाटलांचा वाडा गावाची शान होता. दारातून आत आल्यावर तुळशीवृन्दावन होते. वाड्यात दूधदुभती जनावरं देखील होती. गाय आणि तिचे वासरू, दोन म्हशी, पाच सहा शेळ्या. किसन पाटील म्हणजेच दाजी. आई वडिलांच्या पश्च्यात मेहनत करून तीस एकर शेती, जनावरे कमावली होती. शेतीच्या कामात स्वतःला पूर्णपणे त्यांनी झोकून दिले होते. प्रगत शेतीबद्दलचे धडे ते गावातील तरुण पिढीला देत होते. विहिरीतील मुबलक पाणी , बागायत जमीन आणि आई वडिलांच्या आशीर्वादसोबतच वरुणराजामुळे शेतीला बरकत होती.
पहाटेच्या निरव शांततेमध्ये शांतव्वा काही तरी गुणगुणायची. तिला साद देत गोठ्यातल्या गाई , म्हशी त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज करत. त्यामुळे सारा आसमंत उजळून निघायचा. शांतव्वाच्या लहानपणी तिच्या आईचे ते मधाळ गुणगुणणे तिच्या स्मरणात होते. त्यानंतर डोक्यावरचा पदर हा सावरत एका हाताने जळण चुलीत घालायची तर दुसऱ्या हाताने फुंकरीच्या साह्याने चूल पेटवायची. मग गोटा साफ करून दूध काढायला घ्यायची. हि सर्व कामे आटोपल्यावर डोक्यावर भाकरीचं गाठोडं घेऊन सूर्य माथ्यावर येण्याच्या आत  नागमोडी वळणाचा रास्ता पार करून  अर्धा मैल चालत शांतव्वा रान गाठायची. सांजवेळी तुळशीसमोर हात जोडून जेव्हा ती उभी असायची तेव्हा लुकलुकणार्या दिव्यातून येणारा पिवळसर मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडल्यावर ठसठशीत मोठं कुंकू कपाळावर लावणारी शांतव्वा लक्ष्मीसारखी प्रतीत व्हायची.
वयाच्या पंधराव्या वर्षीचं शांतव्वाचं लग्न झालं होतं. शांतव्वाच्या घरची परिस्थिती हि बेताचीच होती. पाच खाणारी तोंडं. पाटलाचं स्थळ चालूनच आलं होतं म्हणून शांतव्वाचे हात पिवळे केले. दाजी म्हणजे शरीराने दणकट, नेहमी पांढरे धोतर आणि झब्बा घातलेला ,डोक्यावर फेटा, सरळ टोकदार नाक ,निमुळते ओठ आणि गालापर्यंत आलेल्या मिश्या, यामुळे दाजी रुबाबदार दिसायचे आणि या दाजींसोबतच शांतव्वाची गाठ बांधली गेली. कमी वयातच मोठी जबाबदारी तिच्यावर पडली होती तरी हि ती पूर्ण श्रद्धेने सर्व काही करायची. शांतव्वा सुरवातीला त्यांना घाबरायची पण नंतर हळू हळू त्यांचा स्वभाव तिला समजत गेला. तिला शिकायची आवड होती. चुलीत जेव्हा चिटोऱ्या, फाटलेले कागद ती घाले तेव्हा दाजीच्या नकळत त्यात काय लिहलं आहे हे वाचायचा ती प्रयत्न करायची. लग्नाला आठ वर्ष झाले होते तरी पण पाळणा हलला नव्हता. शांतव्वाने बरेच उपास केले. नवस बोलले तरी पण काहीच झाले नाही. अलीकडच्या काळात दाजी शांत शांत राहू लागले होते. त्यांची चीड चीड होत असे पण ते शांतव्वाला काही बोलत नव्हते. पण तिला त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून दिसत होते ते. मुलं नसल्याचं वैफल्य दिवसेंदिवस गडद होत  चाले  होते. सकाळी वाड्यातून बाहेर पडल्यावर भर उन्हांत रानातील कामे करून विश्रांतीसाठी दाजी आमराई मध्ये जात असत. दूरवर पसरलेली झाडे त्याला लटकलेले मोहर. त्यामुळे शिवारात एक सुवास दरवळत होता. मधून मधून माश्या गुंजारात होत्या. त्या गर्द सावलीत आणि निरव शांततेत दाजींचे भणभणारे डोके थोडे  शांत व्हायाचे.
असेच दिवस जात होते. एके दिवशी शांतव्वाच्या माहेरवरून सांगावा आला. तिच्या भावाच्या म्हणजेच सुख्याच्या पोराचं बारसं होतं. ती आनंदाने हुरळून गेली. एवढ्या दिवसानंतर माहेरवरून बोलावणं आलं होतं. सुसाट वारा यावा त्यात बेभान पाऊस पडून जावा आणि त्यातच सैरावैरा धावणाऱ्या वासरासारखे तिचे मन माहेरच्या चौकटीवर येऊन धडकले आणि ढगांच्या कोपऱ्यातून सूर्य किरणांनी कानोसा घ्यावा तसं तीच मन बालपणीच्या आठवणींचा कानोसा घेत होतं. माता यशोदेने लोण्याचा गोळा लहान्या श्री कृष्णाच्या हातावर ठेवल्याने प्रफुल्लीत मुद्रा करून बागडावे तसे शांतव्वाचे मन बागडत होते. ओढ्याच्या पलीकडे शांतव्वाचं माहेर. सुख्या हा शांतव्वाच्या पाठीवरचा. लहान पोरांचा तिला लळा होता. शांतव्वाला भाऊ झाल्यावर अख्या गावात तिने पेढे वाटले. आपल्या भावाला ती खाऊ पिऊ घालायची, अंघोळ घालायची. त्याच्या हनुवटीला धरून त्याचा भांग पाडायला तिला खूप आवडायचे. प्रेमाने सर्व काही करायची. सुख्याच्या पोरासाठी तिने चांदीचा करदोडा आणि भावा आणि वहिनींसाठी आहेर घेतला. आज त्याच भावाच्या पोराच्या बारशाचा सांगावा आला होता. दुसऱ्या दिवशी सगळी कामं उरकल्यावर सकाळच्या बसने माहेरी जाण्याचा रास्ता तिने धरला.
गावाची सर्व मंडळी खोपट्याजवळ जमली होती. एकीकडे बाया जेवण बनवण्यात मश्गुल होत्या तर आलेल्या बायकांना हळदी कुंकू तारा देत होती. तारा म्हणजे शांतव्वाची चुलती. तर एकीकडे पुरुष मंडळी सरपंचासोबत गप्पा मारण्यात मग्न होते. खोपटीला रंगरंगोटी केल्यामुळे जुनीच खोपटी नव्याने भासत होती. कार्यक्रम चालू व्हायाला अजून बराच अवधी असल्यामुळे अंगणांतच पारिजातकाच्या झाडाखाली गोदा पोराला खेळवत बसली होती. गोदा म्हणजेच शांतव्वाची वाहिनी. शांतव्वा बाजूलाच चपल काढून पोराला डोळं भरून बघू लागली. पोराने सुख्याचा मुखडा घेतला आहे म्हणून मनोमन शांतव्वा खुश झाली. पोतडीतून आणलेलं सर्व सामान बाहेर काढत गोदाच्या हाती सुपूर्त केले. मायेने दोघांच्याही चेहऱ्यावरून हात फिरवून स्वतःच्या डोक्याला लावत कडा कडा बोटं मोडली. बाप झाल्याचा आनंद सुख्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. शांतव्वा तिथून उठून खोपटीत कामाला हात भार लावायला गेली. तिची पाट वळाल्यावर गोदाने काही क्षणांतच आक्रोश करायला सुरुवात केली. तिच्या आवाजाने खोपटीतील सर्व लोक आता अंगणात जमा झाले. तिच्या पोराने डोळे पांढरे केले होते. सर्दीमुळे त्याच्या अंगात ताप होता. घरातील उपचारामुळे दोन दिवस अंगावरच काढले होते. ताप त्याच्या डोक्यात जाऊन त्याने डोळे पांढरे केले. ह्या सर्व बाबींचं खापर मात्र शांतव्वाच्या माथी मारलं गेलं. "झंझोटी ,पांढऱ्या पायाची माझ्या पोराला खायला आलीस का इथं?". गोदाचे हे शब्द ऐकून शांतव्वाचं काळीज चर्र चर्र झालं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. लहानपणी जिच्या हातचे दोन घास खाल्याशिवाय गुपचूप बसणाऱ्या सुख्याने आज त्याच हाताला धरून त्याने सर्वांदेखत फरफटत शांतव्वाला बाहेर काढत ह्या घरची पायरी चढू नकोस बजावले. एका क्षणात त्याने तिला परके केले. जात्याच्या दोन दगडी पाटा एकमेकांवर घासून डाळीचे चिथडे व्हावे तसं तुकडे तिच्या काळजाचे झाले
रवी ताकात घुसळावी तसं अनेक विचार शांतव्वाच्या मनात घोळत होते. डोळ्यांत आसवे घेऊन जड अंतकरणाने तिने सासरकडची बस पकडली. कंबरेत जोराची लाथ कुणी तरी मारावी आणि सगळं अवसान गळून पडावं अशी तिची अवस्था झाली होती. भावाने केलेल्या अपमानाने ती कोलमडून गेली. घडलेला प्रकार तिने दाजींना सांगितला नाही. शांतव्वाच्या अवस्थेकडे बघून तिच्या माहेरी काही तरी झालेलं आहे हे दाजींनी हेरलं. राना वनात वणव्याने घेतलेल्या आगीत भस्म होऊन पडलेल्या पाचोळ्यासारखी शांतव्वा रात्रभर तळमळत राहिली. माहेरचा एक आधार होता आता तो हि तुटला.
तिथून आल्यावर शांतव्वाच्या डोक्यात काही तरी शिजत होते, दाजींना बोलायचं कसं याचा विचार ती करत होती. सकाळी जेवण झाल्यावर पाण्याचा तांब्या दाजींना देत शांतव्वा म्हणाली ,"थोडं बोलायचं हुतं बोलू का "?. दाजी तिच्याकडे बघताचं बोलत होते ," मंग , बोल कि कुणी अडवलं हाय ". दाजी आपल्या भारदस्त आवाजात बोले. शांतव्वा नरमाईने घेत बोलू लागली," नाय म्हटलं आपल्यास्नी पोर बाळ होइनात तवा  म्यास  सवत आणायचा इचार करावा". शांतव्वा तिच्या हृदयावर दगड ठेवतच दाजींना बोलत होती. तिच्या आवाजात समजुतदारपणा वाटत होता आणि धन्याची काळजी तिच्या बोलण्यात प्रखरपणे जाणवत होती. त्यांचं सुख कशात आहे हे तिला कळून चुकले होते. नवऱ्याचं सुख ते आपलं सुख असं मानून चालणारी भाबडी शांतव्वाच ती.  शांतव्वाच्या काळजाला लागलेली जखम अजून भरली नव्हती. दाजी शांतव्वाच दुःख समजू शकत होते पण त्यांचाही नाइलाज होता. तिचं पोरा बाळासाठी झुरत राहणं दाजी उघड्या डोळ्याने बघण्याखेरीस काहीच करू शकत नव्हते.
तिच्या प्रश्नाने निरुत्तरीत होतं चेहरा लालबुंद करत राग-रागात फेटा घेऊन झप झप ढांगा टाकीत दाजींनी रानात जायचा रास्ता धरला. रागात बाहेर पडलेल्या दाजींच्या वागण्याचा अर्थबोध  शांतव्वाला समजत नव्हता. रानात गेल्यावर दाजी आमराईमध्ये जाऊन एका झाडाच्या सावलीमध्ये आपला देह जमीवर टाकत हाताची त्रिकोणी घडी डोक्याखाली घेत झाडाच्या फांद्यामधून दूरवर पसरलेल्या आभाळात त्यांची नजर गेली. ते शांतपणाने विचार करत होते. आपल्याला मुल बाळ होत नाही ह्यात दाजींचा दोष आहे हि गोष्ट त्यांनी शांतव्वापासून लपवून ठेवली होती. दुसरं लग्न केल्याने त्यांचा प्रश्न सुटणारा नव्हता. त्या गोष्टीचे संपूर्ण ज्ञान त्यांना होते. दाजींचं शांतव्वावर खूप प्रेम होतं. दाजी विचारांच्या कोशात अडकत चाले होते.
हृदयाला बोचणाऱ्या काट्यांवर मात करण्यासाठी दाजींनी एक योजना आखली. वाड्यावर आल्यावर दाजी डोक्यावरचा फेटा काढत शांतव्वाला बोलू लागले, "ये अस्सं समोर माझ्या". शांतव्वाला दाजी आता मायेने बोलत होते. शांतव्वाने मानेनेच नकार दर्शवला. तसे दाजी हसायला लागले. दाजी अनपेक्षितपणे समोर येताच मागे जाणारा पदर लगबगीने पुन्हा डोक्यावर घेतला. पण तिने आपली नजर जमिनीवर रोखली होती. शेवटी शांतव्वाच्यासमोर उभे राहत दाजी तिला बोलू लागले, "तुला लिवया वाचया लयं आवडतंय ठावं हाय म्यास्नी. आपल्या वाड्यातील मांजर कसं च्वारुन दूध पितया तसं तुला च्वारुन वाचितांना कीत्यानंदा बघितल्या म्या. शांतव्वाची चोरी पकडली गेली म्हणून ती डोक्यावरचा पदर कपाळापर्यंत घेत खांदे गालापर्यंत घेऊन जात मान हि कासवासारखी आणखीनच आत घेऊन दाजींपासून चेहरा लपवण्याचा भाबडा प्रयत्न करू लागली. मनांत असलेले शल्य आणि कोलाहल दाजी शांतव्वासमोर मांडत बोले, “आपल्यास्नी पोर बाळ होत नाय यात तुझा काय बी द्वाश  नाय. समदा द्वाश माझ्यात हाय.”  तशी शांतव्वाची नजर दाजीच्या नजरेला भिडली. शांतव्वाच्या नजरेतून तिची होणारी घुसमट,बैचेनी दाजींना पिळवटून टाकत होती. एवढे दिवस सोसलेले शिव्या शाप कुणाकडे हि त्याचे गराहने करता एकटी कण्हत राहिली शांतव्वा. एवढ्या वर्षांची खंत उरी बाळगून असणाऱ्या दाजींनी आपले दोन्ही हात जोडत शांतव्वाकडे माफीची याचना केली आणि ओक्सबोक्शी रडू लागले. तिच्या डोळ्यांतून हि घळा घळा पाणी वाहू लागले. शांतव्वाने आपले दोन्ही हात दाजींच्या हातावर ठेवत मोठया मानाने त्यांना माफी दिली. पुढे दाजी बोलत होते, “दुसऱ्यांदा लगीन केलं तर गाव तोंडात शानं घाललं ते येगळंच पण तुला अंतर द्यायचं माझ्या बाप जन्मात व्हायाचं नाय बघ.. हे ऐकताच ती मनोमन सुखावली. आता स्वतःला सावरत दाजी दृढ निश्च्याने बोलत होते, “म्या काय तरी ठरवलं हाय. तु पुढलं शिकशान घ्यावं आणि गावचा इकास करावा असं म्यास्नी वाटतया. तुझ्या पाठीस म्या भक्कमपण उभा राहीन. तिच्या अश्रूंचा बांध कधीच तुटलाआई वडील निवर्तल्यावर दाजींना शाळा सोडून पोटा पाण्यासाठी शेतीची कामं करावी लागली होती. दाजी चवथी पास होते. ते स्वतः शिकले नाहीत पण आज शांतव्वाला शिकायची आण घालून तिला पाठींबा देणार होते.
तिच्या ध्यानी मणी नसणारे असे काही तरी विचार दाजींकडून येतील असं तिला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. दाजींवर तिची परमेश्वरा इतकीच निष्ठा असल्यामुळे  दाजी जे सांगतील ते पडत्या फळाची आज्ञा मानत पुढच्या शिक्षणाचा श्री गणेशा केला. गावातील मास्तरलाच दाजीने वाड्यावर बोलावलं. शांतव्वासाठी एक शाळा वाड्यावर भरणार होती. घराचा उंबरठा हा फक्त विहिरीतील पाणी उपसण्यासाठी ओलांडला जावा हि समजूत फोल ठरवत शांतव्वाने मात्र सुटलेली पाटी पेन्सिल परत एकदा हातात घेतली होती. आपल्यासोबत गावातील बायकांनीही शिकायला हवे हि भावना तिला शांत बसू देत नव्हती. बायकांना शिकता यावं म्हणून तिने दाजी आणि मास्तरांच्या मदतीने 'रात्र शाळा' सुरु केली. सकाळी शांतव्वा जे काही शिकत असे तेच ती  'रात्र शाळेत' शिकवत असे. विधार्थिनीपासून एका शिक्षिकेमध्ये तिचे रूपांतरण झाले होते. एकीकडे दाजी गावातील पोरांना प्रगत शेतीचे धडे देत होते तर एकीकडे शांतव्वा शिक्षणाचे धडे गिरवत होती. तिला आता हळू हळू शिक्षणाचे महत्व पटू लागले होते. शांतव्वा आता मॅट्रिक पास झाली होती.
गावातील मुली शहाण्या झाल्या किंवा पैशाअभावी किंवा कुण्या श्रीमंताचं स्थळ  चालून आलं  कि मग लगेच त्यांचं लग्नाचं बघायचं. जे वय मौजमजा करण्याचं असतं त्या बालवयात त्यांच्यावर प्रौढत्वाच्या ओझ्याचा हंडा देत संसाराच्या दावणीला बांधून टाकलं जायचं  आणि  शिक्षणाची ओढ हि कागदावर येण्याआधीच तो कागद चुरगळा जायचा. शांतव्वा गावातील बायकांचे , मुलींचे मन वाचत होती. त्यांना मोकळेपणाने बोलता यावं म्हणून शांतव्वाने गावातच 'मुक्तांगण वर्गासोबतच  'साक्षरतेचे वर्ग' सुरु केले. गावातील बायकांना शिक्षणाचे धडे देऊ लागली. गावातुन शिक्षणाच्या सभा ह्या शांतव्वा , दाजी आणि मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली होत होत्या. गिरवू अक्षर, होऊ साक्षर’, 'मुलगी शिकली प्रगती झाली', 'शिक्षण जर घेशील मुला ज्ञान थोर करेल तुला','हट्ट नको वंशाच्या दिव्याचा हट्ट हवा साक्षरतेचा' , असे आणि बरेच घोषवाक्य पाटलांच्या गावात ऐकू येऊ लागले. शांतव्वा मात्र गावातील बायकांसाठी आणि मुलींसाठी सावित्रीबाई फुले झाली होती. शब्दांची एकमेकांशी घातलेली सांगाड व त्यांचा नेमका अर्थबोध ती शिक्षणातून देऊ लागली. विचारांची अक्षरधारा ज्ञानगंगेच्या रूपात गावामध्ये झेप घेऊ लागली होती. शिक्षणासोबतच हळू हळू हुंडा बळी , बालविवाह कसे थांबवता येतील याकडे सुद्धा लक्ष देत असताना बायकांना त्या गोष्टीचे महत्व पटवून देऊ लागली. 
दोघांनीही आपल्या दुःखाला कवटाळून बसता त्यातून एक मार्ग काढला. शिक्षणामुळे शांतव्वाच्या दुःखावर फुंकर मारली गेली होती. गाव, गावातील माणसं, बायका, लहान पोरं आपली मानून त्यांच्या प्रगतीकडे लक्ष दयायला त्यांनी सुरुवात केली होती. आज दाजी आणि शांतव्वामुळे गाव हा खऱ्या अर्थाने सम्रुद्ध आणि विकसनशील झाला होता. आपल्या कष्टाच्या दौलतीमधून दाजींनी आणि शांतव्वाने अनाथ पोरांना दत्तक घेतले होते. गावा गावात शांतव्वासोबत दाजींचे नाव हि अभिमानाने घेतले जाऊ लागले. आता त्यांच्या गावा व्यतिरिक्त इतर गावाच्या बायका - पोरी शिक्षण घेऊ लागल्या होत्या. खऱ्या अर्थाने गावचा विकास झाला होता. शिक्षणाच्या हिमतीवर शांतव्वाने दुनियेला जिंकले होते आणि त्याचमुळे समाजाने तिला आता नावे ठेवता तिची पाठराखणच केली होती.



                                                                                                                    वृषाली सुनगार-करपे