नीता सभावाने अतिशय प्रेमळ, शांत
, समंजस आणि भावनाप्रधान होती. खुपच साधी राहणी
होती तिची. दोनी भूवयांच्या थोडेसे वरती कपाळाच्या अगदी मधोमध
एक लाल रंगांची टिकली असे , लांब केसाची वेणी घालून कधी कधी मोगऱ्याचा
गजरा लावायची , नाकात एक बारीक खडा होता, तिने परिधान केलेल्या पोशाखाला शोभेल अश्या बांगड्या हातात असायच्या.
घरी भरपूर श्रीमंती. आई वडिलांना एकुलती एक मुलगी
म्हूणन लाडात वाढलेली . लाडात वाढलेली असली तरी हि संस्कार हे
गरीब घरचेच होते . घरी आलेल्या गेलेल्या लोकांचा मान ती आनंदाने
करत असे. तिची कलेच्या क्षेत्रातील आवड बघून तिला त्यातच
संधर्भातील अभ्यासक्रम करायला तिच्या आईने सुचवले. घर सजवणे, बगीचा फुलवणे, टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी करणे , हे सर्व आणि बरच काही तिला करायला आवडायचे. एखाया
लहानबाळाची काळजी घ्यावी तशी नीता घरातील प्रत्येक माणसांच्या सोबत निर्जीव गोष्टींची
काळजी घेत असे. असच नीता एकदा ट्रिप साठी गेली होती. जाताना तिने आईला सांगितलं होत कि बगीचेचीही काळजी,घे
पाणी सोड. पण कामाच्या घाई मध्ये तिच्या आईकडून झाडांना पाणी
द्यायचं राहून गेल. एक दोन दिवसानी घरी परत आलेल्या नीताने बागेतल्या
सुकून गेलेल्या फुलंकडे , झाडांकडे बघून घर अगदी डोक्यावर घेतलं होत. शेजारीपाजार्यांची तर ती खुपच लाडकी
होती. तिच्या प्रेमळ स्वभावाने ती सर्वांनाच आपलंस करत असे.
नीता वयामध्ये आल्यावर तिला शोभेल असा जोडीदार बघायला सुरुवात झाली होती.
तेव्हाच नात्यातलं स्थळ चालून आलं. मुलगा हुशार
, देखणा शिवाय एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी करत होता. घरी तोही एकुलता एक होता. सर्व गोष्टी जुळून आल्यावर
लग्नाची तारीख काढली गेली. नीताच्या स्वभावामुळे सासरकडच्या माणसांसोबत
जुळवून घायला तिला जास्त अवघड गेलं नाही. तिच्या संसारात ती रमली
होती. बघता बघता त्यांच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झाले आणि घरी
एक नवीन पाहुणा यायची चाहूल लागली. नीताने सुंदर अश्या छोट्या
नीतालाच जन्म दिला होता जणू. दोनी घरचा आनंद हा गगनात मावेनासा
झाला होता. छोट्या नीताच
नाव ठेवलं गेलं गार्गी. गार्गीचा सांभाळ करता करता आता नीताचा
दिवस जात असे. बघता बघता गार्गी आता ४ वर्षाची झाली होती.
अजय हा कामानिमित्ताने
बाहरेच असे .गार्गी आणि अजयची भेट म्हणजे
हि शिवकालीनच.
गार्गी एकदा आंगणात खेळात होती. तिची सर्व
खेळणी ती बाकीच्या मुलांसोबत share करत होती. खेळता खेळता गार्गी रडायला लागली आणि रडतं रडत ती नीताकढे गेली. नीताने हातातली सर्व काम सोडून तिला जवळ घेत विचारलं कि," बाळ , काय झालं ?" डोळे पुसत
हिरमुसलेल्या चेहऱ्याने गार्गीने एकदा तुटलेल्या खेळण्याकडे बघितलं आणि मग नीताकडे.
एव्हाना नीताला सर्व प्रकार लक्षात आला तेव्हा नीता गार्गीच्या चेहऱ्यावरून
मायेने हात फिरवून बोलत होती,"आपण बाबाना सांगून नवीन खेळणं
आणायला सांगूयात". गार्गीचे डोळे पुसून तिच्या हातात एक
बिस्कीट देऊन तिला परत खेळायला पाठवून दिले होते. नीता विचार
करू लागली कि लहान मुलांना निर्जीव गोष्टी सोबत किती लळा लागतो जणू काही मोलाची गोष्ट मोडकळीला आली
आहे असे वागतात. ती विचारात असताना तिचा फोन वाजू लागला.
अजयचा फोन बघून ती खुश झाली होती. तो संध्याकाळी
घरी येणार होता. अजय खुप दिवसानी येणार म्हणून त्याच्या आवडीच्या
जेवणाचा बेत तिने आखला.
रात्री जेवण झाल्यावर नीता आणि अजय बगीच्यामध्ये
फिरत होते. आकाशात भरपूर चांदणं , लख प्रकाश
, बगीचे मध्ये फुललेल्या विविध जातीच्या फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत
होता. पारिजातकाच्या फुलांचा सडा जणू त्या दोघांसाठीच होता.
हवेत गारवा असल्यामुळे अधून मधून मंद हवेची झुळूक येत जात होती.
थोडंस फिरून झाल्यावर दोघेही जवळच असलेल्या झोपाळ्यावर बसले होते.
खुप दिवसानी दोघेही मानमोकळ्या गप्पा मारत होते. घरातील घडलेल्या घटनांचा पाढा वाचायला तिने अजयसमोर सुरुवात केली. अजयच लक्ष बहुदा हे whatsapp वरचे संदेश वाचण्यामध्ये
होते. तेवढ्यात नीता बोली कि ," अरे
, कुठं आहे लक्ष तुझं ? ऐकतोयस ना ?
". तेव्हा तो खडबडून जागा झाला आणि तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ
लागला. अजयला काही तर सांगायचं होते म्हूणन तो तिला मधेच थांबून
म्हंटला काही अंदाज तर लाव मला काय सांगायचं आहे ते.
तिने सांगितलेलं सर्व अंदाज चुकीचे निघाले. म्हणून
अजय हसत होता. तिला समजतच नव्हते कि काय झालं आहे. शेवटी कंटाळून ती घरात जात होती, हे बघून अजय बोलू लागला
कि ," घरमालकाच्या फोन आला होता घर सोडायला सांगितलं आहे
". हे ऐकताच चालली नीता तितेच थांबली तिथेच एक वळण घेऊन मोठ्याने
काय असं ओरडली. ते बघून अजय बोला कि ," अगं, किती मोठयाने ओरडतेस?" हळू जरा. घराचं सोडायला सांगितलं आहे शहर नव्हे.
चाल आता झोपायला बाकीच्या गोष्टी उद्या बोलू. नीताला
काहीच कल्पना नव्हती किंवा तिने असा विचार हि केला नव्हता कि आपल्याला हे पण घर सोडावे लागेल.
ते सर्व ऐकून नीताने आलेला आवंढा गिळला.
आपल्या आधी झोपलेल्या गार्गीकडे बघून तिला
खुप कौतुक वाटत होते. दोघेही आपल्या रूम मध्ये आले. अजय खुप दमल्यामुळे
लगेच झोपी गेला होता. नीताला काही झोप येत नव्हती. ती एकटक छताकडे बघत होती. घरात आल्यापासून आठवणीची उजळणी तिला होत होती. घरातील तिचं पाहिलं पाऊल, घरी आल्यावर तिचं झालेलं जंगी
स्वागत , रुसवे फुगवे , गार्गीच येणे आणि
त्यानंतर झालेलं सेलेब्रेशन , तिचे बोबडे बोल आणि तिचं पाहिलं
पाऊल, शेजाऱ्यांसोबत केलेल्या ट्रिप्स , साजरे केलेले सणवार , संकटकाली धावून आलेले रक्ताची नसलेले
पण जिवाभावाचे मित्र मैत्रिणी , ह्याच
घरात केलेल्या पार्ट्या , वाढदिवस आणि सर्वात शेवटचं म्हणजे सर्वांच्या
हृद्यांमध्ये असलेली एक खास जागा म्हणजे हवेशीर बगीचा. तिथेच
नीताने चिऊ काऊच्या गोष्टी सांगत सांगत गार्गीला मोठं केलं होत. हे सर्व चित्र तिच्या डोळ्यासमोरून जात न्वहते. तिचा
जीव गुदमरू लागला होता म्हणून ती मोकळ्या असलेल्या बेडरूमच्या सज्जामध्ये गेली.
बाहेर येत येत डोळ्यातील पाणी गालावर ओघळून
कधी आले याची तिला कल्पना सुद्धा नव्हती. एक
मोठा श्वास घेत तिने डोळे पुसले. तिला काही तर लक्षात आले असावे
म्हणून तिची मान लगेच गार्गीकडे वळली. सकाळी आपणच तिला बोलो होतो
कि , " बाबाना सांगून नवीन खेळणं आणूयात". तिला आता समजत होत कि लहान मुलांना निर्जीव गोष्टींचा एवढा लळा का असतो . 'घर' आणि 'खेळणं' ह्या दोन्ही गोष्टी तश्या निर्जीवचं आहेत. पण काळजी , प्रेम
, आपुलकी आणि हक्क ह्या सर्व गोष्टीमुळेच आपला जीव त्यामध्ये गुंतलेला असतो. एक निर्धार करतच नीता बेडजवळ गेली आणि झोपेत असलेल्या गार्गीचा मुका घेऊन तीही
झोपी गेली. सकाळी गार्गी उठण्याआधी नीताने तिचं तुटलेलं खेळणं
परत नीट करून ठेवलं होत.
सौ.वृषाली सुनगार- करपे