Friday, 2 April 2021

लगोरी

लतिका परत एकदा आई झाली. नुकताच तिच्या मुलीचा दुसरा वाढदिवस झाला होता आणि ती पहिल्या गरोदरपणातून अजून पूर्णपणे बाहेर हि आलेली  नव्हती.  तेवढ्यात तिला दुसऱ्या बाळाची चाहूल लागली. तिच्यासाठी हे सगळे पचायला अवघड होते. एवढ्या लवकर तरी तिला दुसरे बाळ नको होते. नुकतीच परत एकदा तिने नोकरीसाठी शोधाशोध चालू केलेली. ह्यामध्ये जर आपली आधीची नोकरी असेल तर तिकडे जाऊ शकतो पण आधीच्या नोकरीला रामराम ठोकला असेल तर फक्त अनुभव उराशी कवटाळून   मार्केटमध्ये उडी घ्यावी लागते. ती दुसऱ्या प्रकारात मोडत होतीत्यावर पण विरजण पडणार होते.  खर तर मुख्य कारण हे ह्या सगळ्यांपेक्षा वेगळे होते. मुळात तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार होती. मूल झाले कि त्यांच्याप्रमाणे आपली दिनचर्या करावी लागते. किमान एक दोन वर्ष तरी आपण काही काम करू शकत नाही किती हि इच्छा असली तरी. जर घरचे कुणी बाळाकडे लक्ष द्यायला असतील तर मग आपला जीव भांड्यात पडतो. अन्यथा आपले हात दगडाखाली असतात.  

Before  आणि after या गरोदरपणामध्ये लतिका गुरफटून गेली होती. आता जर पुढे जायचा विचार केला तर तिच्या मते तिला घरीच राहावे लागेल. कारण मुलगी नुकतीच दोन वर्षाची झालेली आणि मुलगा दोन महिन्यांचा. दोघांचे खाणे पिणे सगळे काही आई म्हणून तिच्यावरच होते. दोघेही लहान असल्याकारणाने वडीलांपेक्षा आईचा सहवास त्यांना जास्त जवळचा आणि मायेचा वाटायचा. दोघे जसे जसे मोठे व्हायला लागले तसे  तिला प्रश्न पडायला लागले कि जेव्हा दोघेजण शाळेत जातील तेव्हा मी काय करायचे? रोज उठलं कि तिला एकच प्रश्न भेडसाव्याचा कि काय करायचे. लग्नाआधी आणि नंतर काही काळ तिने नोकरी केलेली. अचानक घरी थांबल्याने तिला घर खायला उटायचे. लग्नआधी तिला चित्र काढणे , डान्स करणे, बगीच्या मध्ये झाडे लावणे त्यांची काळजी घेणे , घरात सतत बदल करत राहणे ह्या गोष्टींची तिला आवड होती इन शॉर्ट कल्पक काम. क्षणाचा हि विलंब लावता हातामधून वाळू निसटून जावी तसे लग्नानंतर ह्या गोष्टी तिच्या हातातून निसटून गेल्या होत्या आणि त्याबद्दल तिला खंत हि वाटायची.

आई झालेल्या किंवा नव्याने आई होऊ पाहण्याऱ्या प्रत्येक बाईला ह्या सर्व चाकोरी मधून जावे लागते. कधी कधी तिला मुलांच्या नुसार जुळवणी करावी लागते तर कधी घरातल्या कामामुळे यामध्ये तिने कधीच स्वतःला असा वेळ दिलेला नसतो किंवा देत नाही. मुले मोठी होइपर्यंत त्यांना काय हवं नको बघण्यातच तिचं आयुष्य खर्ची पडते. जेव्हा मुलांच्या पंखात बळ येते आणि ते एक दिवस अचानक उडून जातात तेव्हा समजत कि मुले आता खरंच मोठी झालेली आहेत. लतिकाची नजर बाहेर काही मुले खेळत असतात तिकडे जाते. तिथे एक गोल केलेला असतो आणि त्यामध्ये एका वर एक छोट्या छोट्या फारश्या ठेवून त्याला चेंडूने पडायचे निष्पाप प्रयत्न करायचे आणि मग एक टीम ते सगळ्या फारश्या परत एका वर एक ठेवणार दुसरी टीम पहिल्या टीमला ते ठेवण्यापासून परावृत्त करणार. सांगायचा उद्देश काय तर ते एकमेकांवर ठेवलेल्या फारश्या चेंडूच्या धक्याने त्या गोलच्या बाहेर तरी जातील किंवा आत तरी पडतील पण जी फारशी तळाशी असते तिची उडी फक्त कुंपणापर्यंतच. आईच पण तसेच होते मुले मोठी झाली कि बाहेर पडतात पण आई हि जिथे होती तिथेच असते फार फार तर त्या गोलाच्या कटापर्यंतच.

तिकडून एक छोटी मुलगी लतिकाच्या दिशेने धावत आली आणि तिला म्हणाली ,"काकी तो चेंडू फेक ". विचारात गुरफटून गेलेली लतिका भानावर येत उसने हसू तोंडावर आणून चेंडू त्या मुलीच्या दिशेने फेकला आणि तिच्या सोबत संवाद साधायचा म्हणून तिने त्या मुलीला प्रश्न केला कि," तुझं, नाव काय गं?". त्या छोट्या मुलीने तिला उत्तर दिले ,"लतिका". तिला काही सुचेनासे झाले पुढे काय बोलावे कळेना. त्या छोट्या लतिकाच्या रूपात तिला जणू तिच्या संपूर्ण बालपणाचा काळ उलगडला आणि लतिकाला पडलेल्या प्रश्नांचे कोडे सुटले.

ती घाई घाईने घरात गेली. अडगळीत ठेवलेली धुळीने माखलेली चौही बाजूने थोड्या फार अंतराने चेमटलेली फिकट चॉकलेटी रंगाची अशी एक पेटी तिने खाली काढली. ती पेटी तिने तिच्या लग्नात रुखवतामध्ये जाणून बुजून आईला सांगून ठेवून घेतलेली. सोन्यापेक्षा हि खूप महत्वाचा दागिना त्यामध्ये होता. त्या पेटीमुळे तिच्या कामाची उजळणी होणार होती. आजपर्यंत तिने हे सगळे जीवपाड जपून ठेवले होते. त्यात तिचे चित्रकलेचे सामान होते, तिने काढलेल्या चित्रकलेच्या वह्या , गावी जाताना काही छायाचित्रे काढले होते त्यांच्या छापील प्रतीचा एक संच आणि बरच काही. ते बघून तिला एक नवीन उर्मी आली. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्यामुळे मुले आणि नवरा उशिरा उठणार हे तिला माहिती होते ते उटायच्या आधी तिने कडक असा चहासोबत एक वही पेन घेऊन ती सज्यामध्ये जाऊन बसली . 'श्री गणेशा ' वहीच्या मधोमध लिहून सुरवात केली. त्या वहीमध्ये तिने एक वेळापत्रक तयार केले तिचे छंद जोपासायला आणि हळू हळू लतिकाच्या कामाचा श्री गणेशा झाला.

आई म्हणणारी व्यक्ती मुलांच्या संगोपनामध्ये स्वतःला एवढी गुंडाळून घेते कि त्या व्यतिरिक्त एक आयुष्य तीच स्वतःच पण आहे हे ती विसरते बहुदा. त्यांच्या आवडी निवडी जपण्यामध्ये आपण आपल्या विसरून जातो. काही काळानंतर त्यांच्या आवडी ह्या तिच्या होऊन जातात.  आई वडील म्हणून आपण त्याचं आयुष्य हे अधीक सुखकर करायच्या मागे असतो. मुलांच्या आपल्या काढून काही जास्त मागण्या नसतात. त्या त्या वयात त्यांना हवे असते आई वडिलांचं प्रेम , माया आणि एक माणूस बनून समाजामध्ये राहता येईल एवढी शिकवण. मुले मोठी होतात नंतर त्यांची लग्न हि होतात. ते त्यांच्या आयुष्यात रममाण होतात. आपण मात्र तेव्हा एकटे पडलेले असतो ह्याची जाणीव आपल्याला  होत राहते. आणि त्याचे रूपांतर नैराश्यामध्ये होते. 

त्या ऐवजी जर आपल्याकडे आधीपासूनच एखादा सुंदर छंद असेल तर तोच आपण पुढे पुढे घेऊन जाऊ शकतो अगदी मरेपर्यंत. छंद हि अशी गोष्ट आहे ती तुम्हाला तुमचा वेळ देते आणि स्वतःला ओळखायला मदत हि करते. त्यामुळे आपण आपल्या कामात नेहमीच व्यस्त राहतो आणि बाकीच्या विचारांना आळा आपोआपच बसतो. फुलाला जसा गंध असल्याशिवाय त्याकडे पाखरू आकर्षित होत नाही तसे माणसाला हि छंद असायला हवे त्या शिवाय माणसाच्या आयुष्यात गंध राहत नाही. आणि खूप महत्वाचं म्हणजे म्हातारपणाची मेरेथॉन अगदी तरुणपणाने गाठायची असेल आणि निवृत्तीनंतर मन स्वस्थ ठेवायचे असेल तर उपयोगी येणार आहे ते म्हणजे छंदच. मग आपण आपल्या कामाचा करायचा का श्री गणेशा?.

 

सौ . वृषाली सुनगार - करपे  

6 comments:

  1. U are best... Wonderfully put up... Guess this is wat mother wud feel post kids... Gud to hear that the Latika here found the happiness in her kids n her world... Hope every mother finds same n be happy always

    ReplyDelete
  2. खूप सुंदर..👌👌

    ReplyDelete